काजूला शासनाने हमीभाव द्यावा…

शरद पवार यांचे वेधणार लक्ष : युवक राष्ट्रवादीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश लाड यांची माहिती_

*💫बांदा दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापारी व कारखानदार यांच्या युतीमुळे जिल्ह्यातील काजू बागायतदार आर्थिक अडचणीत अडकले आहेत. जिल्ह्यातील काजूला जीआय मानांकन मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर काजूला शासनाने हमीभाव द्यावा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश लाड यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यात काजूचे उत्पादन घेण्यात येते. हंगामात लाखो टन काजूचे विक्रमी उत्पादन शेतकरी घेतात. जिल्ह्यात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात १०० टक्के क्षेत्र हे काजू लागवडीखाली आहे. येथील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा हा काजू उत्पादनावर अवलंबून आहे. मात्र वाढलेले काजू उत्पादन हे व्यापारी व कारखानदार यांना फायदा देणारे ठरत आहे. शेतकऱ्यांना थेट फायदा होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाने काजू प्रक्रिया उद्योग उभारावा व शेतकऱ्यांच्या काजूची थेट खरेदी करावी यासाठी आम्ही शरद पवार यांच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न करू. यासाठी विविध शेतकरी संघटना, फळबागायतदार संघ यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येईल असेही लाड यांनी सांगितले. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना घेऊन लवकरच मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेऊन काजूला हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमची भूमिका ही शेतकाऱ्यांसोबत असून आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे लाड यांनी सांगितले.

You cannot copy content of this page