मालवणच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि नगरसेवक गणेश कुशे यांचे उद्यापासून उपोषण

मालवण दि प्रतिनिधी अपूर्ण अवस्थेतील भुयारी गटार योजना, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बाबत धर्मदाय आयुक्तांचे गहाळ झालेले पत्र, आरोग्याची समस्या व भाजी मार्केट येथील अनधिकृत गाळ्याचा प्रश्न या आणि इतर विविध प्रश्नांबाबत मालवण नगरपालिकेचे प्रशासन, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष अपयशी ठरल्याने या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उद्या दि. ५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या आमरण उपोषणावर आपण ठाम असल्याची भूमिका मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. मालवण नगरपालिकेच्या मनमानी व गैरकारभारा विरोधात उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्याधिकाऱ्यां कडून कोणतीही कारवाई न झाल्याने वराडकर व कुशे यांनी ५ एप्रिल रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना राजन वराडकर म्हणाले, मालवण नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामाला १३ वर्ष होऊन गेली. मात्र ती योजना अपूर्ण अवस्थेत आहे. याबाबत यापूर्वी प्रशासनाने योजनेचे ८० टक्के काम झाल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यानंतर आता ८८ टक्के योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गेल्या साडे चार वर्षात ८ टक्के एवढेच काम झाले का ? भुयारीचे रडत रखडत काम सुरू असतानाच प्रशासनाने ठेकेदाराला ५ कोटीचे बिल अदाही केले. भुयारी गटार योजनेच्या याच ठेकेदाराला जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले होते. त्यावेळी आमदार वैभव नाईक व जिल्हाधिकारी यांच्यासमोर ठेकेदाराने डिसेंबर २० पर्यंत ही योजना पूर्ण करू असा शब्द दिला होता. परंतु आजपर्यंत त्याचा थांगपत्ताच नाही. प्रशासनाचे ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे कर्तव्य होते. मात्र ब्लॅक लिस्ट सोडाच मात्र साधी नोटीसही प्रशासनाने बजावली नाही. अशा स्थितीत ठेकेदार प्रशासनाला खेळवत असताना ठेकेदाराने भुयारी गटार योजनेचे काम अपूर्ण असताना उर्वरित ३५ ते ४० लाखाच्या बिलाची मागणी केली आहे. याबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांकडे ठेकेदाराचे बिल अदा करू नये असे पत्र दिल्याचे वराडकर म्हणाले. मालवण नगरपालिकेच्या भाजी मंडईतील आठ गाळे धारकांवर बांधकाम तोडण्याची कारवाई केली. मात्र एका गाळे धारकाला सूट दिली गेली, त्याच्यावर कारवाई का नाही. मालवण शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत मात्र प्रशासन दंडात्मक कारवाई पुरते मर्यादित राहीले आहे. मच्छिमार्केट, कॉम्प्लेक्स व सार्वजनिक ठिकाणचा कचरा महिनाभर उचललाच गेला नाही. जनतेचे फोन नगरसेवकांना येत आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी महिनाभराची मुदत मागितली होती, मात्र त्यावरही अद्याप कार्यवाई झालेली नाही. कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार संबंधित ठेकेदारांनी रखडवले आहेत. याबाबत कामगार मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी पगार देणे हा ठेकेदाराचा विषय आहे, ते आमच्या हातात नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. यामुळे आरोग्य विषयी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व प्रशासन यापैकी कोणाला दोष द्यावा असा सवाल वराडकर व कुशे यांनी केला. मालवण शहरात जनतेच्या जिव्हाळ्याचे असे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत याची उत्तरे सभागृहात ना प्रशासन, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्याकडून दिली जात नसल्याने आणि सभागृहात वारंवार लोकप्रतिनिधींचा आवाज दडपला जात असल्याने यावर ठोस भूमिका घेण्यासाठी आपण उद्यापासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे वराडकर, कुशे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page