मनसेची मागणी:जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन..
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्रांवर नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले.
सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जेव्हा आधारकार्ड मुख्य पुरावा म्हणून सक्तीचा करण्यात आला त्यावेळी जिल्ह्यातील काहीच मुख्य ठिकाणी आधार कार्ड केंद्रे असल्याने आधार कार्ड केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. अशावेळी नव्याने आधार कार्ड बनवताना असलेल्या गर्दीचा ताण यामुळे अथवा फुलचुकीने कर्मचाऱ्यांकडून माहिती भरत असताना काही वेळा जन्म दिनांक, जन्म ठिकाण, नावातील अक्षर, पत्ता याप्रमाणे अनेक चुका झालेल्या आहेत. त्या दुरुस्त करताना सध्याच्या आधार कार्ड केंद्रांमध्ये यूआयडीए मार्फत अनेक पर्याय उपलब्ध असूनही आधारकार्ड केंद्रधारक मुख्यता एकाच पुराव्यावर अडून बसणे असे प्रकार सुरू आहेत. जसे की एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख दुरुस्त करायची असेल तर त्याला फक्त जन्म दाखला द्या तरच अपडेट होणार अथवा होणार नाही असे सांगितले जाते. ह्या अशा प्रकारांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या अनेक योजना उदाहरणार्थ विमा योजना, अनेक प्रकारच्या पेन्शन योजना तसेच आता नव्याने सुरू झालेली लाडकी बहीण योजना इत्यादीचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे सदर प्रश्नी गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना होणारी अडचण दूर करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर आधार कार्ड केंद्र संचालकांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले. सदर निवेदन देताना जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, माजी उप तालुकाध्यक्ष अविनाश अणावकर हे उपस्थित होते.
