तहसीलदार कार्यालयातूननागरिकांना सुविधा व दाखले तात्काळ मिळण्यासाठी कार्यवाही करावी…

अरविंद मोंडकर:अन्यथा भर पावसात कार्यालयासमोर आंदोलन करणार..

⚡मालवण ता.१८-:
मालवण तहसीलदार कार्यलयात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा व दाखल्यांबाबत दिरंगाई होत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. मालवणच्या तहसीलदारांमध्ये कामाची तत्परता व कार्यालयीन पकड दिसून येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून नागरिकांना सुविधा व दाखले तात्काळ मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अन्यथा येत्या काही दिवसात मालवण तहसीलदार कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन करण्यात येईल, असा उशारा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन सादर करून मालवण तहसीलदार कार्यालयातील कारभाराबाबत लक्ष वेधले आहे. मालवण तहसीलदार कार्यालयात उत्पन्न दाखला, डोमेसाईल, जातीचे दाखले, विविध पेंशन योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड व अन्य विविध दाखले याबाबत नागरिकांना तब्बल तीन ते चार महिने वाट पहावी लागत आहे. मालवण शहरासह तालुक्यातील गावागावांमधून नागरिक मालवण तहसीलदार कार्यलयात या सुविधांसाठी येत असतात. मात्र हे नागरिक वारंवार फेऱ्या मारत आहेत. दाखल्यांसाठीचे अर्ज सेतू मधून संबंधित टेबलावर जाण्यासाठी तसेच साधे टपाल नोंद दाखल झाल्या नंतरही हे दाखले संबंधित अधिकारी यांची सही होण्यासाठी त्या टेबलावर जाण्यापूर्वी टपाल टेबलावर पंधरा ते वीस दिवस ताटकळत पडलेले असतात. यामुळे नागरिकांना भर पावसात देखील विनाकारण वेळेचा अपव्यय व आर्थिक भुर्दंडला सामोरे जावे लागत आहे. याचा फटका शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही बसत आहे, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.

प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यास मालवणच्या तहसीलदार या महसुली कामा बाबत अनुभवाने कमी असल्याचे जाणवत आहेत, यापूर्वी मालवण तहसीलदार कार्यालयात आलेले तहसीलदार व आजच्या विद्यमान तहसीलदार यांमध्ये कामाची तत्परता तसेच कार्यालयीन पकड नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप अरविंद मोंडकर यांनी करीत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून दाखले तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी मोंडकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page