रेवंडी ग्रामस्थाचे उद्या खाडीपात्रात उपोषण…

कांदळवन बंधारा नासधुस प्रकरणी प्रशासनाने लक्ष न घातल्याने निर्णय

मालवण दि प्रतिनिधी खालची रेवंडी किनाऱ्यालगत कांदळवन व पतन विभागाच्या संरक्षक बंधाऱ्यांची तोडफोड करून काही व्यक्तींनी खाडीपात्रात केलेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या रेवंडी ग्रामस्थांनी इशारा दिल्याप्रमाणे उद्या सोमवार दि ५ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून रेवंडी खाडीपात्रात उतरून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत रेवंडी गावचे माजी सरपंच युवराज कांबळी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान, रेवंडी ग्रामस्थांच्या भूमिकेला तळाशील व सर्जेकोट ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याची माहितीही युवराज कांबळी आणि विजय कांबळी यांनी दिली आहे . मालवण तालुक्यातील खालची रेवंडी येथील खाडीत काही व्यक्तींनी खालची रेवंडी किनाऱ्यालगत असलेल्या कांदळवन व पतन विभागाच्या संरक्षक बंधाऱ्यांची तोडफोड करून खाडीपात्रात जांभा दगड व माती टाकून मार्ग तयार केला जात आहे. खाडीत सुरू असलेल्या अतिक्रमणबाबत रेवंडी ग्रामस्थांनी मालवणच्या तहसीलदारांसह पतन विभाग, कांदळवन विभाग यांच्याकडे अलीकडेच लेखी तक्रार दाखल करून या अतिक्रमनामुळे खाडीचा प्रवाह बदलला जाऊन गावे उधवस्थ होण्याची भीती व्यक्त केली होती. दरम्यान, या अतिक्रमणा बाबत प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर कांदळवन व बंधारा तोड झाल्याचे स्पष्टही झाले. मात्र याबाबत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा गुन्हे दाखल झाले नाहीत याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असून वन विभाग व पतन विभागाने घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या समक्ष खुलासा करावा असे श्री युवराज कांबळी यांनी स्पष्ट केले आहे. कांदळवन तोड हा गंभीर गुन्हा असताना शासकीय पंचनामे होऊनही वन विभाग कारवाई का करत नाही ? पतन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या बंधाऱ्यांची तोड झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट होते मात्र पुढील कारवाई पतन विभाग का करत नाही ? असे सवाल उपस्थित करत वन विभाग व पतन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे युवराज कांबळी यांनी माहिती देताना सांगितले. खाडीतील पाण्यात उतरावेच लागणार रेवंडी किनारी ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी खाडीपात्रात आंदोलन छेडले जाईल. कांदळवन व बंधारा तोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. खाडीतील अतिक्रमण तात्काळ हटवले जावे. या प्रमुख मागण्या असल्याचे युवराज कांबळी यांनी माहिती देताना सांगितले.

You cannot copy content of this page