प्रवाशी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली दूर:सातत्याने पाठपुरावा केल्याने आमच्या मागणीला यश;रियाज खान..
⚡बांदा ता.१६-: बांदा बसस्थानकात बस गाड्यांची घोषणा करण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सुविधा आजपासून सुरु करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी महिन्याभरापूर्वी निवेदन देऊन मागणी केली होती. सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी बसस्थानकात ध्वनीक्षेपक उपलब्ध करून दिला.
महाराष्ट्र – गोवा सीमेवरील बांदा हे महत्वाचे बसस्थानक आहे. येथून राज्य तसेच आंतरराज्य बससेवा आहे. अनेक ग्रामीण भागात येथून बससेवा आहे. नियमित प्रवासी संख्येबरोबरच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी येथून मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. मात्र ध्वनीक्षेपक नसल्याने अनेक वयोवृद्ध प्रवाशांना बसची माहिती मिळत नव्हती. यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने रियाज खान यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन ध्वनीक्षेपक उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली होती.
त्याची दखल घेत एसटी प्रशासनाने याठिकाणी ध्वनीक्षेपक उपलब्ध करून दिल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
