कुडाळ मॉन्सून रनसाठी 750 स्पर्धक सज्ज…

हाफ मॅरेथॉनची तयारी अंतिम टप्प्यात:डॉ. जी टी राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती..

⚡कुडाळ ता.१२-: राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर तसंच टीम कुडाळ मान्सून रन 2024 तर्फे येत्या रविवारी 14 जुलै रोजी भव्य अशा कुडाळ मॉन्सून रन 2024 अर्थात हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या हाफ मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेत सिंधुदुर्गसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इथल्या विविध भागातून सुमारे 750 स्पर्धक सहभागी झाले आहेत, अशी माहिती राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर जी टी राणे आणि डॉ. प्रशांत मडव यांनी दिकी. ते कुडाळ इथं आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘एव्हरी रनिंग स्टेप मेक्स युवर हार्ट स्ट्रॉंगर’ ही टॅग लाईन घेऊन पाच-दहा आणि 21 किलोमीटरची ही भव्य हाफ मॅरेथॉन असणार आहे. आरोग्यासाठी चालणं किंवा धावण हे महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर धावता धावता पावसाळ्यातला कोकणचा निसर्ग अनुभवण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आल आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये रत्नागिरीचे आयर्नमॅन डॉक्टर तेजनन्द गणपत्ये, मुंबईतले आयर्न मॅन अरविंद सावंत असे प्रसिद्ध धावपटू सहभागी होणार आहेत, असं डॉक्टर जी टी राणे आणि डॉ. प्रशांत मडव यांनी सांगितलं.
5, 10 व 21 किलोमीटरची ही पावसाळी आंतराज्य हाफ मॅरेथॉन स्पर्धा 14 जुलै रोजी सकाळी 6 वाजता कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथून सुरु होणार आहे. सिंधुदर्गासह मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी येथून 750 धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यासाठी कुडाळ टीम मान्सून रन सज्ज झाली आहे. स्पर्धेकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राणे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे अध्यक्ष जी. टी. राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी येथे केले.
यावेळी रुपेश तेली, डॉ. जयसिंह रावराणे, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. संजय केसरे, डॉ. प्रशांत मडव उपस्थित होते.
डॉ. राणे म्हणाले, राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ हे 2022 पासून कार्यरत असून या दोन वर्षात राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर ने मेडिकल क्षेत्रात अत्यंत महत्वाची कामगिरी केली आहे. तसेच आरोग्यासंबंधी जनजागृतीसाठी वेळोवेळी अनेक उपक्रमाचे नियोजन केले आहे. आरोग्यासाठी चालणे किंवा धावणे महत्त्वाचे आहे. व्यायाम व आरोग्याबद्दलची जनजागृती व्हावी, सर्वांचे जीवन प्रोत्साहित होण्यासाठी पावसाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसह सिंधुदुर्ग सायक्लीस्ट असोसीएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांचे ज्येष्ठ सदस्य टिम मॉन्सून रन या नावाने हा उपक्रम पार पडण्यास सज्ज आहेत.
या मॅरेथॉनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी होणार आहेत. रत्नागिरीचे आयर्न मॅन डॉक्टर तेजानंद गणपत्ये व मुंबईचे आयर्न मॅन अरविंद सावंत या प्रसिद्ध धावपटूंची साथ कुडाळ मान्सून रनची शोभा वाढवेल, असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी ७५० स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. तसेच स्पर्धेसाठी अजूनही साधारण २०० स्पर्धक सहभागासाठी इच्छुक होते. परंतु ८ जुलैपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असल्यामुळे त्यानंतर सहभागासाठी इच्छुक असलेल्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी करून घेणे शक्य झाले नाही. ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाणार आहे. यावर्षी ज्या स्पर्धकांना सहभागी होता आले नाही, ते स्पर्धक पुढील वर्षी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार असून खुल्या गटातून तसेच वयोमानाप्रमाणे आखलेल्या गटामधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख पारितोषिकही देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत विशिष्ट अंतरावर 5 बूथ असतील. ढोलपथके आणि कुडाळ सायकल क्लबचे सदस्य देखील स्पर्धकांचा उत्साह वाढवतील. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट दिली जातील.
कुडाळ एमआयडीसी बॅ. नाथ पै मधून सुरू होणारी ही मॅरेथॉन नेरूर मार्गे वालावल मंदिर येथून नदीपर्यंत जाईल, तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, स्पर्धकांना प्रोत्साहित करावे, पावसाळी मॅरेथॉनचा आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रशांत मडव म्हणाले, हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 750 स्पर्धकांमध्ये जिल्ह्यातील 200 डॉक्टर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे ही एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा आहे. तसेच पुढील वर्षी ‘जेआर10’ नावाचा गृप या स्पर्धेसाठी असेल. डॉ. जयसिंह रावराणे यांच्या नावाने हा गृप असून त्यातील 10 हा आकडा मैल दर्शवतो. म्हणजेच 16 किमी अंतर. 21 किमी अंतरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि डॉ। जयसिंह रावराणे यांच्या रनिंग मधील कार्याचा गौरव करण्यासाठी हा गृप पुढील वर्षी सहभागी होईल असे डॉ. प्रशांत मडव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page