बांदा/प्रतिनिधी
मानवी जिवंत पुतळ्याची (स्टॅच्यू) कला सादरीकरण करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गरजू विद्यार्थी व समाजातील गरजवंत व्यक्तींना मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कार्यरत असलेल्या येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईतील सोहळ्यात लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
अलाईव्ह ग्रुप मधील मनोज सुरेश कल्याणकर, विश्वास तुकाराम सावंत व उर्वेश प्रसन्ना पावसकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्टॅच्यू अलाईव्ह ग्रुपचे संस्थापक मनोज कल्याणकर यांनी सर्वप्रथम जिवंत मानवी पुतळे हुबेहूब साकारात सर्वांची वाहवा मिळविली होती. बांदा शहराचा सांस्कृतिक महोत्सव असलेल्या दीपावली शो टाईम मधून ही कला सर्वदूर पोहोचली होती. आजपर्यंत गोवा, महाराष्ट्र राज्यात अनेक सांस्कृतिक महोत्सव तसेच कार्यक्रमात अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपने जिवंत मानवी पुतळे सादर केले आहेत.
केवळ स्पर्धेत भाग न घेता सामाजिक बांधिलकी जोपासात कोकण तसेच महाराष्ट्रातील अनेक मतिमंद, विकलांग शाळेत तसेच वृद्धाश्रमात मिळालेल्या उत्पनातून मदत करत खऱ्या अर्थाने सामाजिक वारसा जोपासला आहे. त्यांच्या या कार्यासाठीच अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बांदा वासियांसाठी ही अभिमानास्पद बाब असून ग्रुपचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
