मालवण बसस्थानकाच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडणार…

ठाकरे शिवसेनेचा इशारा:पदाधिऱ्यांनी बस स्थानकाची केली पाहणी..

मालवण : (प्रतिनिधी)

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सुरु झालेले मालवण बस स्थानकाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने याबाबत मालवणातील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दूरध्वनी वरून विभाग नियंत्रकांशी चर्चा करीत बस स्थानकाच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिऱ्यांनी सोमवारी मालवण बस स्थानक येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना तालूका समन्वयक मंदार ओरसकर, महिला आघाडी तालुका समन्वयक पूनम चव्हाण, तालुकाप्रमुख दीपा शिंदे, सिद्धेश मांजरेकर, निनाक्षी शिंदे, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मालवण बस स्थानकाची इमारत नादुरुस्त बनल्याने आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून सात वर्षांपूर्वी नवीन इमारत मंजूर होऊन त्याला निधी देखील उपलब्ध झाला. यानंतर इमारतीचे काम सुरु होते. स्वतः आमदार वैभव नाईक याचा पाठपुरावा करीत होते. मध्यंतरी कोरोना मुळे काम थांबले. पण यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुती सरकारने या कामाचा निधी थांबवल्यामुळे मालवण बस स्थानकाच्या इमारतीचे काम रखडले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र अद्याप कामाला सुरुवात देखील झालेली नाही. मागील वर्षी जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून एकाला दुखापत देखील झाली होती. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा हरी खोबरेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page