किनारपट्टीवरील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार…

निलेश राणे:वायरी येथे हॉटेल पर्यटन व्यावसायिकांची बैठक संपन्न..

⚡मालवण ता.०९-:
मागील दहा वर्षे किनारपट्टीवरील अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्याने येथील पर्यटन व्यावसायिकांसमोर अनेक समस्या आहेत. तुम्ही संधी दिली तर इथले सर्व प्रश्न मी स्वतः मंत्रालयात मांडणार आहे. या विकासकामांचा मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला असून येत्या पाच वर्षांत मागील दहा वर्षाचा बॅकलॉग आपण भरून काढणार असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी वायरी येथे बोलताना केले.

वायरी येथील हॉटेल किनारा येथे पर्यटन व्यावसायिकांची बैठक संपन्न झाली. यावेळी निलेश राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर, अशोक तोडणकर, तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, देवानंद लोकेगावकर, केदार झाड, मनोज खोबरेकर, दाजी सावजी, महेश लोके गावकर, बाळू पडवळ, पंकज सादये, मंदार लुडबे, बबन गावकर, पांडू मायनाक यांसह अन्य उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे यांनी किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायिकांना अकृषिक शेत सारा तसेच विजेच्या प्रश्नाचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांचा आपण पाठपुरावा सुरू केल्याचे सांगून श्री राणे यांनी इथल्या जनतेने चमत्कार घडवून आणत लोकसभेला विजय खेचून आणला आहे. जे काही प्रश्न या भागात शिल्लक राहिले आहेत त्यांची पूर्तता करण्याचे काम लवकरच होईल. आपणही केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजेत, असेही निलेश राणे म्हणाले.

वायरी भूतनाथ गावामध्ये कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. शासन स्तरावर अनेकदा पाठपुरावा करूनही समस्या जैसे थे राहिली आहे. गावामध्ये योग्य क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत अशी मागणी देवानंद लोकेगावकर यांनी केली. त्याचप्रमाणे गावातील अंतर्गत रस्ते, आणि पर्यटन सुविधांचा विकास व्हावा, अशीही त्यांनी मागणी केली. यावर निलेश राणे यांनी या मागण्या लवकरच मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही दिली.

वायरी भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील विक्रम तोडणकर यांचे राहते घर काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जळाल्याने तोडणकर यांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी सकाळी निलेश राणे यांनी जळालेल्या घराची पाहणी करत विक्रम तोडणकर यांची भेट घेतली. यावेळी राणे यांनी तोडणकर यांना धीर देत मदतीचा हात दिला.

You cannot copy content of this page