कुर्ली घोणसरी कालव्याचे बांधकाम कोसळले…

एक कोटी खर्च होवूनही सहा महिन्यात कामाची दुरवस्था..

वैभववाडी प्रतिनिधी
         कुर्ली – घोणसरी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे नव्याने करण्यात आलेले बांधकाम कोसळली आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे सहा महिन्यापूर्वी केलेले काम कोसळल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवाय नव्याने करण्यात आलेल्या बांधकामाला अनेक ठिकाणी भेगा गेल्या असल्याने खर्च झालेला निधी पाण्यात केला आहे.


        कुर्ली घोणसरी  देवधर पाटबंधारे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे वीस वर्षे झाली आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर कालव्यांची कामे हाती घेण्यात आली होती. या प्रकल्पाला उजवातीर कालवा व डावातीर कालवा असे प्रमुख दोन कालवे तयार करण्यात आले आहे. या दोन कालव्यांपैकी उजव्या तिर कालव्याचे पाटबंधारे विभागामार्फत वाढीव काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे  अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन निविदा करण्यात आली. यात दोन किलोमीटर लांबीच्या कालव्याचे  लाइनिंग चे काम प्रस्तावित होते.हे काम  हडपसर पुणे येथील ठेकेदार कंपनी करीत आहे.
       डिसेंबर 2023 पासून या कामाला सुरुवात करण्यात आली. प्रस्तावित कामापैकी काही काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम सुरू असतानाच ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आणि ग्रामस्थांनी केला होता. मात्र त्याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी उजव्यातील कालव्याचे पूर्ण झालेले बांधकाम आचिर्णे खरल याठिकाणी कोसळले आहे.
       हाच कालवा पुढे आचिर्णे मधली वाडी, दर्डेवाडी, मोईन वाडी, माळवाडी येथे जातो. नव्याने केलेले बांधकाम सहा महिन्यात कोसळत असेल तर शासनाच्या पैशांचा हा अपव्य असून झालेल्या उर्वरित कामाचाही दर्जा तपासला जावा. अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. कोसळलेल्या भागाव्यतिरिक्त अन्य अनेक ठिकाणीही कालव्याच्या बांधकामाला भेगा गेलेल्या असल्याने कालव्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी संबंधित ठेकेदार कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची चौकशी होऊन ठेकेदार कंपनीसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
        याबाबत पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री कोठावळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उजव्या तिर कालव्याचा नव्याने बांधण्यात आलेला काही भाग कोसळल्याचे मान्य केले. ठेकेदार कंपनीकडून हे काम नव्याने करून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र झालेल्या बांधकामाच्या दर्जा बाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला.
          दरम्यान ठेकेदार कंपनीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली असून कामाचा दर्जा न राखल्यास शासनाचा निधी पाण्यात जाण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page