पीडित व्यक्तीला न्याय देणे हे कायद्याचे प्राथमिक उद्दिष्ट…

प्रवीण कोल्हे:अंमली पदार्थ विरोधी कायदा व सायबर क्राईम” याविषयीवर मार्गदर्शन..

⚡मालवण ता.०३-: भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाने देशातील विविध कायद्याची माहिती घेणे आवश्यक आहे. अन्यायाविरोधात लढताना कायद्याचे ज्ञान असणे जास्त महत्वाचे ठरते. भारतीय न्याय संहितेमध्ये पीडित व्यक्तीला न्याय देणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे बोलताना केले.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनएसएस विभाग अर्थशास्त्र व कॉमर्स विभाग तसेच अँटी रॅगिंग सेल यांच्यावतीने ‘भारतीय न्याय संहिता’ या विषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, गोपनीय विभागाचे पोलीस श्री. ढोले आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी प्रवीण कोल्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी प्रवीण कोल्हे यांनी दि. १ जुलै पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जुनी भारतीय दंड संहिता आणि नवीन भारतीय न्याय संहिता या दोन्हींमधील ठळक फरक त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांनी “भारतीय साक्ष अधिनियम” तसेच “अंमली पदार्थ विरोधी कायदा आणि सायबर क्राईम” याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे संयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. देविदास हारगिले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले तर आभार डॉ. एम आर. खोत यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

You cannot copy content of this page