आम. नितेश राणे यांच्याकडून दिशाभूल:मालवणात ठाकरे शिवसेनेकडून टीका..
⚡मालवण ता.०१-: हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत मालवण तालुक्यास दवाखाना मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात तो सुरूच झाला नसल्याचे वास्तव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आरोग्य विभागास भेट देत उघडकीस आणले. आमदार नितेश राणे यांनी हे दवाखाने सुरू असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांची तसेच सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आम. राणे यांचा ठाकरे शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात येत आहे, असे यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी सांगतानाच येत्या काही दिवसात ‘आपला दवाखाना’ सुरू न झाल्यास ठाकरे शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दिला.
पावसाळी अधिवेशनात काल आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्व दवाखाने सुरू असल्याचे सांगितले. यावरून आज मालवणात ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, अक्षय रेवंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तालुका आरोग्य विभागास भेट देत माहिती घेतली. यावेळी तालुक्यास आपला दवाखाना मंजूर आहे. मात्र तो सुरू नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. धनगे यांनी दिली आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी याबाबत विधानसभेत आवाज उठविल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी हे दवाखाने सुरू असल्याचे जे सांगितले आहे, ती बनवाबनवी आज प्रत्यक्ष उघड झाली आहे. सर्व आलबेल आहे असे सांगायचे आणि जनतेची फसवणूक करायची त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांचीही त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा उबाठा सेनेच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे यावेळी हरी खोबरेकर यांनी सांगितले.
आपला दवाखाना शासनाने तात्काळ सुरू करून सर्वसामान्य जनतेला चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याची कार्यवाही येत्या काही दिवसांत न झाल्यास ठाकरे शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही श्री. खोबरेकर यांनी यावेळी दिला.
