तहसीलदार विरसिंग वसावे यांचा शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता…

ई केवायसीसाठी घेतली विशेष मेहनत:घरी जात केले प्रयत्न..

कुडाळ : शासन आपल्या दारी सारखे कॉर्पोरेट उपक्रम आपण नेहमीच पाहतो, पण एखादा शासकीय अधिकारी जेव्हा संवेदनशीलतेन काम करतो त्यावेळी गोरगरीब जनतेची काम लवकर होतात असं म्हटलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी २०२३-२४ मध्ये झालेल्या शेती नुकसानीच्या भरपाईसाठी बंधनकारक असलेली इ केवायसी करायला लाभार्थी आला नाही तर त्याला नुकसानभरपाई मिळणार नाही हे जाणून त्या वयोवृद्ध आजारी लाभार्थ्यांच्या घरी जात स्वतः त्याची ई-केवायसी करुन घेतली. त्याचबरोबर शेतीचा हंगाम असल्यानं शेतात काम करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी शिबिरात आणण्यासाठी त्यांच्या शेतापर्यंत शासकीय गाडी पाठवून ई केवायसी पूर्ण करून घेतली.
कुडाळ तालुक्यात सन 2022-23 मध्ये नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या भातशेतीची सुमारे 30 लाख 62 हजार 33 रूपये नुकसान भरपाई मंजूर आहे. ती रक्कम लाभार्थीच्या खात्यावर जमा व्हावी, यासाठी त्या-त्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. कुडाळ तालुक्यात 1 हजार 282 नुकसानग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे. शासनाने याबाबत वारंवार आवाहन केले होते, त्या आवाहनानंतर सुध्दा तालुक्यात अजुनही 91 लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी झाली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रक्कम शासनाच्या खात्यात पडुन होती.याची दखल घेत कुडाळ तहसील वीरसिंग वसावे यांनी पुढाकार घेत कोणत्याही परिस्थितीत आपल्या तालुक्यातील एकही शेतकरी नुकसानग्रस्त निधीपासून वंचित राहू नये यासाठी कुडाळ पावशी येथे खास शिबिराचे आयोजन केले होते.यासाठी पावशीतील वाडीवरील ई-केवायसी न केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना शिबिर ठिकाणी आणण्यासाठी व नेवून सोडण्यासाठी आपल्या शासकीय गाडीने व्यवस्था केली.काही शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरुन शिबिर ठिकाणी आणत एकुण 12 शेतकऱ्यांची ई-केवायसी करून घेतली.
कुडाळ तहसिलदार श्री.वसावे यांनी पावशी येथील शिबिर ठिकाणी भेट दिली व परिपूर्ण माहिती घेतली. यावेळी काही लाभार्थी आले नाहीत असे उपस्थित तलाठी व कोतवाल यांनी सांगितले. लाभार्थी शेतकरी ई-केवायसी साठी का आले नाहीत? त्यांची काय अडचण आहे? आपण त्यांच्या घरी जावून येवू, असे सांगत स्वतः तहसिलदार श्री.वसावे आपल्या गाडीने पावशी बेलनदि येथील वयोवृद्ध सद्गुरू तेंडोलकर यांच्या घरी जाण्यासाठी गेले मात्र रस्ता अडचणींचा असल्याने अर्ध्यावर गाडी थांबवून चालत अंथरूणावर असलेल्या वृध्द श्री.तेडोंलकर यांच्या घरी पोहोचले, त्यांचे नाव विचारले, त्यांनी थरथरत्या आवाजात आपले नाव सांगितले.अशा स्थितीत ह्या व्यक्ती केंद्रापर्यंत येणं शक्य नाही याची खात्री झाल्यावर आपल्या यंत्रणेला घरी जावून ई-केवायसी पुर्ण करुन घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
तहसिलदार श्री.वसावे यांच्या या कृतीचे स्थानिक नागरिकांनी खास कौतुक केले.खऱ्या अर्थाने शासन नव्हे तर शासकीय अधिकारीच गोरगरीब जनतेच्या दारी असे चित्र कुडाळ तालुक्यात दिसू लागले आहे.
लाभार्थ्यांच नुकसान होऊन नये म्हणून जेव्हा एखादा शासकीय आधिकारी रविवारची सुट्टी असून सुद्धा वाट वाकडी करून लाभार्थ्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन लाभ मिळवून देतो. त्यावेळी माणुसकी आणि संवेदनशीलता अजूनही शासकीय अधिकाऱ्यांमध्ये जिवंत आहे याचा प्रत्यय येतो.

You cannot copy content of this page