मालवणातील भंडारी हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेशनिमित्ताने आगळे वेगळे स्वागत …

मालवण दि प्रतिनिधी

महिना दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी संपवून नव्या उत्साहाने….. नव्या दमाने…. शाळेला चाललो आम्ही.. असे जणू गीत आळवीत आजपासून शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे मालवण तालुक्यात ठिकठिकाणी वाजत गाजत आणि गुलाबपुष्प देत शाळा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मालवण शहरातील अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज तसेच प्राथमिक शाळेने तर या शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर फुलांची उधळण करीत गुलाबपुष्प हाती देत पंचारती ओवाळून औक्षण करीत अत्यंत दिमाखात विद्यार्थ्यांना वर्गात आसनस्थ केल्यानंतर संस्था चालकांसह शिक्षक वृंदाने शुभेच्छा देत आगामी शैक्षणिक वर्षात विद्याभ्यासात सुयश चिंतीले.

आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने गेले महिना दीड महिने सुन्या सुन्या असणाऱ्या शाळांच्या इमारती आज मुलांच्या किलबिलाटाने आणि चिवचिवाटाने गजबजून गेल्या. मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई संचलित प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाने तर शाळा प्रवेशाचा आगळा वेगळा कार्यक्रम आखित शैक्षणिक क्षेत्रात नवीन पायंडा पाडला आहे .

आज शनिवार असल्याने सकाळीच लवकर उठून नवीन ड्रेस परिधान करून भंडारी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज आणि प्राथमिक शाळेच्या मुला मुलींनी शाळेच्या प्रांगणात प्रवेश करताच त्यांचे मंजुळ स्वरातील सनई वादनाच्या साथीत प्रवेश घेणाऱ्या चिमुरड्यांवर उपस्थित शिक्षक वर्गाने फुलांची उधळण केलीच शिवाय पंचारतीने ओवाळीत औक्षण करीत एका हातात गुलाबपुष्प तर दुसऱ्या हातात लाडू देत विद्यार्थ्यांना सुयश चिंतले. यावेळी उपस्थित संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वामन खोत, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नऱ्होना, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, प्रा पवन बांदेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भुपेश गोसावी , तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रशाळेचे विद्यार्थी हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्येची देवता सरस्वती यांचे पूजन करीत आपआपल्या वर्गात प्रवेशकर्ते होत होती. या शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेत आणि प्रशालेच्या प्रांगणात वैविद्यपूर्ण सजावटी बरोबरच आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती. या प्रवेशोत्सवाची संकल्पना मुख्याध्यापक एच बी तिवले, प्रा पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी राबविली यावेळी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मोफत पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. एकूणच भंडारी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज तसेच प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या या आगळ्या वेगळ्या प्रवेशाने सारे भारावून गेले.

You cannot copy content of this page