वेंगुर्ला नगरपरिषद सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर.
⚡वेंगुर्ला ता.२५-:
वेंगुर्ला शहरातील ऐतिहासिक ‘सेंटलुक्स हॉस्पिटल’ अनेक दशके कोकणच्या आरोग्य सेवेचा कणा राहिले आहे. सद्यस्थितीत हे रुग्णालय बंद असल्याने वेंगुर्ला शहर व ग्रामीण भागातील जनतेला उपचारांसाठी गोवा किंवा कोल्हापूर यांसारख्या दूरच्या ठिकाणी जावे लागते, ज्यामुळे अनेकदा रुग्णांचे प्राण धोक्यात येतात. जर मूळ संस्था (COEMAR किंवा त्यांचे भारतीय प्रतिनिधी) हे रुग्णालय चालवण्यास असमर्थ असेल, तर राज्य शासनाने ‘भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत कायदा २०१३’ अंतर्गत ‘सार्वजनिक आरोग्य’ (Public Purpose) या कारणासाठी ही जागा व इमारत अधिग्रहित करावी किंवा त्याचे व्यवस्थापन दुसन्या सक्षम संस्थेकडे सोपवावे. या संस्थेची ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमा अंतर्गत असलेली नोंदणी आणि त्यांच्या भारतीय प्रतिनिधींचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अधिकृत पाठपुरावा करावा.
जोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत तिथे किमान बाह्यरुग्ण विभाग (OPD) सुरु करण्यासाठी नगरपालिकेने संस्थेशी पत्रव्यवहार करावा. नगरपरिषदेने जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे या रुग्णालय आरोग्य विभागामार्फत संचलन करण्यासाठी ठराव मंजूर करावा. सदर हॉस्पिटलचा जागेचा उपयोग ‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ उभारणीसाठी करण्यात यावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा करावा. सर्व बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी १५ दिवसांत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना सविस्तर प्रस्ताव सादर करावा,
असा महत्वपूर्ण ठराव नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
वेंगुर्ला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, रवींद्र शिरसाट, संदेश निकम,युवराज जाधव, सुधीर पालयेकर, दाजी परब, प्रशांत आपटे, सदानंद गिरप, सचिन शेट्ये, विनय नेरुरकर नगरसेविका आकांक्षा परब, शीतल आंगचेकर, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, गौरी मराठे, गौरी माईणकर, काजल कुबल, सुमन निकम, रिया केरकर, प्रशासकीय अधिकारी अभिजित पाटील, अन्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेला यश मिळाल्याबद्दल, आंबा – काजू बागायतदार यांना 5 लाख हेक्टरि नुकसानभरपाई मिळावी असे ठराव नगरसेवक संदेश निकम यांनी मांडले. वेंगुर्ला शहरातील शासकीय रुग्णालयात 4 तज्ञ डॉकटरची आवश्यकता असून याबाबत येत्या 2-3 दिवसात सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याचे नगराध्यक्ष यांनी सूचित केले. शहरातील वेंगुर्ला हायस्कुल येथे 450 विद्यार्थी असून शाळेच्या इमारत पर्यंत रस्ता करण्यात यावा व टॉयलेट दुरुस्ती नूतनिकरण करण्यात यावी, याबाबत वेंगुर्ला हायस्कुलचा मागणीवजा ठराव घेऊन जिल्हाधिकारी यांची मान्यता प्राप्त झाल्यावर उपलब्ध आमदार, खासदार निधीनुसार काम करण्यात येईल, असे नगराध्यक्ष यांनी सूचित केले.
वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत 30 एप्रिल ते 3 मे या कालावधीत शतकोत्तर महोत्सव घेण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद साठी सर्वप्रकारच्या क्रीडा स्पर्धाचे एप्रिल महिन्यामध्ये आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच नगराध्यक्ष चषक स्पर्धा घेण्यात यावा, अशी सूचना संदेश निकम यांनी मांडली. याबाबत सर्व लोकांसाठी स्पर्धा नियोजन बैठक घेऊन तसेच कमिटी ठरवून स्पर्धा विविध स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपरिषद कार्यक्षेत्रातील वृक्ष संवर्धन साठी ‘वृक्ष प्राधिकरण समिती ‘तसेच ‘क्रीडा स्पर्धा समिती ‘ स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नगरसेवक, कर्मचाऱ्यांनी मिळून (एकूण 150) 1 वर्षाचे झाड दत्तक घेऊन न. प. हद्दीत लागवड करावी, अशी सूचना नगराध्यक्ष यांनी केली व ठराव घेण्यात आला.
25 मे 2026 रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. वेंगुर्लेचा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याबाबत ज्येष्ठ, जाणकार यांच्यामार्फत विस्तृत स्वरूपात माहिती संकलित करून एप्रिलपर्यंत विशेष पुस्तक काढावयाचे आहे. याबाबत ज्येष्ठ जाणकार, ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ साहित्यिक व शहरातील अन्य व्यक्ती यांची कमिटी स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. या विशेष पुस्तकाचे व कार्यक्रमाचे उदघाट्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावयाचे निश्चित झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली. मागील कालावधीत शहरात झालेली भुयारी गटार योजना ची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्याने न. प. हद्दीत नव्याने सांडपाणी युनिट योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले. याबाबत संबंधित दोन ठिकाणी जागा निश्चित करून योजना कार्यान्वित करण्याचा ठराव घेण्यात आला.
स्वच्छता घंटागाड्या विमाच नसल्याने नगरसेवक आक्रमक :
वेंगुर्ला शहरात कचरा संकलन साठी 9 घंटागाड्या कार्यरत आहेत. परंतु गेली काही वर्षे विमाच काढला नसल्याची बाब सभागृहात निदर्शनास आल्यावर नगरसेवक संदेश निकम, प्रीतम सावंत यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याबाबत ड्रायव्हरचा अपघात झाल्यास कोण भरपाई देणार, याबाबत रिपोर्ट द्या, अशी मागणी संदेश निकम यांनी केली. याबाबत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी त्वरित लक्ष घालण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी आपले न. प. चे फायर बुलेट व अग्निशमन बंब सुरु आहेत का? असा सवाल रिया केरकर यांनी उपस्थित केला. तर नवीन अग्निशमन बंब वारंवार का नादुरुस्त होतोय, असा सवाल प्रशांत आपटे यांनी केला. तर सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा डिंक रस्त्यावर पडल्याने अपघात होऊन अनेक दुचाकीस्वार जखमी झाले, हि बाब रवी शिरसाट यांनी सभागृहात मांडली. याबाबत प्रशासनाने अग्निशमक बंब बाबत संबंधित कंपनीला त्वरित पाठपुरावा करावा, वेळोवेळी सर्व्हिसिंग, मेंटेनन्स करण्याच्या सूचना नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी संबंधित अधिकारी, प्रशासनाला केल्या.
तिलारी पाईपलाईनबाबत मच्छिमार, नागरिक यांची संयुक्तिक बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. स्वच्छता कर्मचारी जरी चांगले काम करीत असले तरी कामात कामचुकारपणा करताहेत, अशी बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी प्रशासनाला दिले. सफाई कर्मचाऱ्यांना पगार वेळेत द्या, त्यांना हॅन्डग्लोव्हज, मास्क उपलब्ध करून द्या, अशी सूचना प्रीतम सावंत यांनी मांडली. तर सफाई कर्मचाऱ्यांना क्रमवार एक दिवस सुट्टी द्या, अशी सूचना सुहास गवंडळकर यांनी मांडली. नाट्यगृह 1 ते 8 तास कालावधीत नाटक व सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी 12 हजार रुपये भाडे घेण्याचा ठराव घेण्यात आला. सध्या पर्यटन वाढत असून झुलता पूल येथील कचरा बाबत आजच निर्बंध घातले पाहिजेत, क्रॉफर्ड मार्केट मधील गाळ्यामधील पोटभाडेकरू बाबत न. प. ने वेळीच निर्णय घ्यावा, प्लास्टिक पिशव्या बंदी याबाबत सूचना सुषमा प्रभू खानोलकर यांनी मांडल्या. नागरिकांच्या आरोग्याच्या दुष्टीने वेशी भटवाडी येथील विहीर स्वच्छता त्वरित करण्यात यावी, अशी सूचना प्रीतम सावंत यांनी मांडली. दाभोली नाका, शिरोडा नाका येथे गतिरोधक होण्याबाबत नगराध्यक्ष यांनी सूचना दिल्या. मोकाट गुरांचा प्रश्न सोडवा, अशी मागणी रिया केरकर यांनी केली. समिधा रेडकर यांनी शहरातील स्ट्रीटलाईट सुरळीत करा,
स्ट्रीटलाईट वर नंबर टाका, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, आदी सूचना मांडल्या.
यावेळी शासन निर्णयानुसार 5 टक्के घरपट्टी वाढ बाबतचा ठराव घेण्यात आला. शहरातील स्ट्रीटलाईट चे दर महिन्याला 3.5 लाख इतके वीजबिल येते. त्यामुळे शहरात सोलार प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याचा ठराव घेण्यात आला. 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त महिला व बालकल्याण विभागामार्फत महाआरोग्य शिबीर, महिला सबलीकरण, महिला सक्ष्मीकरण याबाबत विविध स्पर्धा आयोजन करण्यात आल्याची माहिती गौरी मराठे यांनी दिली. मच्छिमार्केट स्वच्छता व्यवस्थित होत नसून स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था करण्याबाबत शीतल आंगचेकर हिने सूचना मांडल्या. शहरात बऱ्याच ठिकाणी कचरा टाकला जात असून अस्वच्छता निर्माण होत आहे, त्यामुळे संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही बसविन्याच्या सूचना संदेश निकम यांनी केल्या. याबाबत नगराध्यक्ष यांनी प्रत्येक जनक्शन, प्रत्येक स्पॉट पाहणी करून सिसी बसविन्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पर्यटन वाढीसाठी वोकिंग सायकल ट्रॅक ही योजना आवश्यक असून दरम्यान यासाठी सीआरझेड मंजुरी आवश्यक आहे. याबाबत नगराध्यक्ष यांच्यासमवेत पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले. आज नवीन जापनीज गार्डन होत असले तरी जुन्या गार्डनकडे दुर्लक्ष होतोय. आपले तारतंत्री काय करताहेत, याकडे प्रशांत आपटे यांनी लक्ष वेधले. उंच पोलवरील झाडी तोडण्यासाठी असलेल्या गाडीचा वापर करण्यात यावा, याबाबतीत सुधारणा न झाल्यास जाब विचारण्यात येईल, असा इशारा प्रशांत आपटे यांनी दिला. यावेळी मच्छिमार्केट विस्तारिकरण, आडीपूल ते कॅम्प रस्ता रुंदीकरण, व्यापारी संकुल हॉल भाडेतत्वावर देणे, नाट्यगृह येथील गाळे 11 महिन्याच्या कालावधी भाड्याच्या करारावर देणे, नवीन अग्निशमक यंत्रणा,स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथील गझीबो डेव्हलपमेंट, जनरेटर सुविधा, मशीनरी, विकासकामे अंदाजपत्रक, शहरातील ट्राफिक समस्या आदिबाबत चर्चा होऊन सर्वानुमते ठराव घेण्यात आले. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाल्यावर प्रशासनाला काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. प्लास्टिक बंदीबाबत रविवारी आठवडा बाजार दिनी धाड/ कारवाई टाकण्यात यावी. मच्छिमार्केट क्लीनिंग वेळीवेळी करण्यात यावे. स्ट्रीटलाईट्स वेळेत सुरु – बंद करण्यात याव्यात, आदी सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी, मुख्याधिकारी यांना दिल्या.
यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी विविध मुद्याबाबत त्वरित पाठपुरावा कार्यवाही सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
