अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या…

आमदार दीपक केसरकर: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे वेधले निवेदनद्वारे लक्ष..

⚡सावंतवाडी, ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आमदार केसरकर यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू ही प्रमुख बागायती पिके असून शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा मुख्य आधार आहेत. दरवर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान या पिकांना मोहर येतो; मात्र यंदा अचानक बदललेल्या हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे मोहरावर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी फळधारणेत मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दि. २१ व २२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आंबा व काजू बागांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. बागायतीसाठी खत, औषधे, कीटकनाशके तसेच व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जही घेतलेले आहे. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे व बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी आमदार केसरकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page