सौरभ अग्रवाल: पोलीस पाटील, शांतता व दक्षता समिती बैठकीत केले आवाहन..
ओरोस ता.१४-:
पावसाळयामध्ये विद्युत लाईन तुटून, दरड कोसळुन अगर पुरपरिस्थिती निर्माण होऊन जिवीत अगर वित्तहाणी होऊ नये याकरीता अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ यंत्रणेस कळविण्यात यावी. याकरीता दामीनी ॲप, सचेत ॲपची जागरुकता निर्माण करा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या पोलीस पाटील, शांतता व दक्षता समिती बैठकीत केले.
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात शुक्रवार १४ जून रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्या उपस्थितीत पोलीस पाटील, शांतता कमिटी, दक्षता समिती, प्रतिष्ठीत नागरीक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकी दरम्यान आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी, आरोग्याची दक्षता या बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच आगामी कोकण पदवीधर निवडणूक अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करणे, बकरी ईद सणाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
१ जुलै २०२४ पासून लागु होणारे नवीन कायदे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 बाबत ओळख व नवीन कायद्यांमधील तरतुदीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी बैठकी करीता पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष कोल्हटकर व शांतता कमिटी सदस्य, दक्षता समिती सदस्य, हॉटेल व्यावसायिक, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.