तो बदलला पाहिजे:जिल्ह्यातील मुलांचा बुंध्याक उत्तम असतानाही लोकसेवा आयोग परीक्षेत जिल्हा मागे
*💫सावंतवाडी दि.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक उत्तम आहे. म्हणूनच ते स्कॉलरशिप,ओलंपियाड सारख्या स्पर्धात्मक परीक्षेत राज्यात सर्वोत्तम असतात तसेच दहावी-बारावीच्या परीक्षेत देखील राज्यात उत्तमच असतात. हि समाधानकारक, अभिमानास्पद व सकारात्मक स्थिती असून देखील सिंधुदुर्गातील विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये चमक दाखवताना दिसत नाही. किंबहुना अशा स्पर्धात्मक परीक्षांकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक आढळत होता. म्हणूनच सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी द्वारे फेब्रुवारी 2014 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष माननीय श्री सुधीर ठाकरे साहेब, जिल्हाधिकारी ई रवींद्रन, तहसीलदार श्री वीरसिंग वसावे, मुख्याधिकारी श्री नितीन नार्वेकर , जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती संध्या गरवारे व सेल्स टॅक्स ऑफिसर श्री अनुज रासम यांच्या मार्गदर्शनाखाली “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून डिसेंबर 2018 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झालेल्या पूनम ठाकरे (आय आर एस – कस्टम अँड सेंट्रल एक्ससाइज ) तसेच नव्यानेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले श्री दत्तू शेवाळे, श्री सुशांत शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त उपायुक्त पदी निवड झालेले श्री बाबुराव दडस यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कोकणात टॅलेंट आहे, क्षमताही आहे पण दिशाहीन प्रवासाने अनेक हुशार मुले बेरोजगारीच्या गर्तेत अडकतात. “स्पर्धा परीक्षा” हा खरंतर स्वतःला सिद्ध करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग. यात कुठेही वशिला नसतो. परीक्षण, बुद्धिमत्ता, सातत्य याचा मेळ घातला तर आयुष्य घडते. फक्त यात स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, अभ्यास करण्याची पद्धत, या परीक्षांमधील तीव्र स्पर्धा समजून त्या दिशेने पावले टाकायचे असतात. याला साथ लागते यशस्वी मार्गदर्शनाची तसेच योग्य त्या पुस्तकांची. म्हणूनच सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान द्वारे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकांची यादी तज्ञांशी सल्लामसलत करून तयार केली गेली. ही पुस्तके मागवून, सिंधुदुर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. यात श्री संदीप जंगले, कुमारी संतोषी गावडे व श्री राजू नाईक यांना पुस्तके प्रदान करून, ते घेत असलेल्या परिश्रमांना सिंधूमित्र तर्फे साथ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये माध्यमिक स्तरापासूनच या स्पर्धा परीक्षांविषयी जागृती निर्माण व्हावी, त्या दिशेने त्यांनी प्रयत्न करावे तसेच या स्पर्धा परीक्षा विषयी जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव ता. सावंतवाडी या प्रशालेला देखील ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या पुस्तकांचा आमची स्वप्ने साकार करण्यात निश्चितच लाभ होईल, अशी भावना लाभार्थी विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली. या उपक्रमासाठी सिंधूमित्र प्रतिष्ठानचे सीए लक्ष्मण नाईक, डॉ. राहूल गवाणकर व श्री सुशांत शेजे यांनी विशेष परिश्रम घेतले.
