रस्ताच बनला घरांना धोकादायक…

म्हापण खवणे गाबितवाडीतील घटना:विठोबा सागवेकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष…

ओरोस ता ३०
रहदारीसाठी, वाहनांच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता पावसाळ्यात तेथील घरांमध्ये पाणी घुसण्याचा तसेच पावसाच्या पाण्याने घराना धोका निर्माण होण्याचे कारण ठरले आहे. म्हापण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खवणे येथील हा प्रकार आहे. याबाबत येथील ग्रामस्थ विठोबा सागवेकर यांनी जिल्हाधिकारी यांचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
पतन विभागाकडून खवणे गाबितवाडी येथील वस्तीतील रस्त्याचे काम केले आहे. हा रस्ता समुद्राकडे जाणारा आहे. परंतु रस्ता करताना येथील सर्व पाणी वस्तीत घुसणार अशा पद्धतीने करण्यात आला आहे. त्यामुळे अलीकडेच पडलेल्या अवकाळी पावसाचे पाणी येथील वस्तीतील घरांत घुसले होते. आता मान्सून दाखल झाल्यावर याचा जास्त त्रास येथील नागरिकांना होवून वारंवार येथील नागरिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच या पाण्यामुळे येथील घराना सुद्धा धोका संभवणार आहे.
याबाबत विठोबा सागवेकर यांनी म्हापण ग्राम पंचायतीला पत्र दिले होते. त्यानुसार ग्राम पंचायतीने पाहणी करून सागवेकर यांच्या तक्रारीला दुजोरा दिला आहे. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी यावर उपाययोजना ठेकेदाराकडून करून घेण्याची विनंती पतन विभागाला केली आहे. तसेच सागवेकर यांनीही स्वतः पतन विभागाकडे लेखी तक्रार याबाबत केली आहे. यात सागवेकर यांनी पतन विभागाला दोषी धरले आहे. ठेकेदार कोणत्या पद्धतीने काम करीत आहे याबाबत पतन अधिकाऱ्यांनी जागेवर जावून पाहणी करणे गरजेचे होते. मात्र, तशी कार्यवाही न केल्याने ही स्थिती ओढावली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर सागवेकर यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधून याबाबत दखल घेण्याची मागणी केली आहे.

You cannot copy content of this page