मान्सून पूर्व पावसाने १०० हेक्टर पिकांचे नुकसान…

९९ गावातील ८४० शेतकरी झाले बाधित..

सिंधुदुर्गनगरी ता २९
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ मे ते २६ मे २०२४ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील ९९ गावातील ८४० शेतकऱ्यांचे ९९.६८ हेक्टर क्षेत्रवरील फळ पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ ते २६ मे या कालावधीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील फळबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ९९ गावातील ८४० शेतकऱ्यांचे ९९.६८ हेक्टर क्षेत्रावरील फळ पिकाचे नुकसान झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील आंबा, काजू पीकासह कोकम, जांभूळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात १६ मे ते २६ मे या कालावधीत मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे फळझाडांचे फांद्या तुटून तसेच फळ गळती होऊन मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील ४ गावातील ३६ शेतकऱ्यांचे ०.९० हेक्टर ,सावंतवाडी तालुक्यात ३६ गावातील ७९ शेतकऱ्यांचे १२.६२ हेक्टर ,दोडामार्ग तालुक्यातील १२ गावातील ६० शेतकऱ्यांचे ८.९० हेक्टर, वेंगुर्ला तालुक्यातील ३ गावातील ९९ शेतकऱ्यांचे २. एकूण ७० हेक्टर , कणकवली तालुक्यातील १० गावातील १९३ शेतकऱ्यांचे १८.६९ हेक्टर ,कुडाळ तालुक्यातील २६ गावातील ३०८ शेतकऱ्यांचे ४३.८० हेक्टर तर वैभववाडी तालुक्यातील ८ गावातील ६५ शेतकऱ्यांचे १२.८ हेक्टर क्षेत्रावरील फळबागायतीचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ९९ गावातील ८४० शेतकऱ्यांचे ९९.६८ हेक्टर क्षेत्रातील फळबागायतींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

*१६ ते २६ मे दरम्यान झालेला तालुका निहाय पाऊस

देवगड २०.७ मिलिमीटर, मालवण २३. मिलिमीटर, सावंतवाडी ८३.०० मिलीमीटर, दोडामार्ग ५८.८ मिलीमीटर, वेंगुर्ला ४०.२ मिलिमीटर, कणकवली ३७.३ मिलीमीटर, कुडाळ ९९.३ मिलिमीटर, वैभववाडी ७४.८ मिलीमीटर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण सरासरी पाऊस ५४.७ मिलीमीटर झाला असल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.

You cannot copy content of this page