बांधकाम विभागाचे दुर्लक्ष: उबाठाच्या अशोक परब यांचा आरोप..
⚡बांदा ता.२८-: बांदा नॅशनल हायवे ६६ ला लागून असलेल्या शंकराचा पुतळा ते वाफोली रस्त्याचा प्रवास मे महिना संपत आला तरी यंदाही खड्डयातूनच करावा लागला. सदरचा रस्ता दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाची कोणतीच हालचाल दिसून आली नाही. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप उबाठा सेनेचे नेते अशोक परब यांनी केला आहे.
दरम्यान पावसाळ्यात तर या रस्त्याची परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे. दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता दुरूस्तीबाबत लोकांनी वेळोवेळी आवाज उठविला असतानाही त्यांच्या मागणीला बांधकाम विभागाने केवळ वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. एसटीचा प्रवासही धक्के खात प्रवाशांना करावा लागत आहे. या मार्गावर वळणांचे प्रमाण मोठे आहे. झाडाझुडपांचा वेढा वाढला असल्यामुळे व रस्ता अरूंद असल्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, पालकमंत्री किवा खासदार यांनी लक्ष घालावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अशोक परब यांनी केली आहे.
