⚡मालवण ता.२८-:
मराठी साहित्यात निबंध लेखन करणे हे फार मोठे कौशल्य आहे. निबंध लेखनासाठी वाचन, चिंतन, मनन आणि नियमबद्ध लेखन आवश्यक असते. प्रा. नागेश कदम यांनी आपल्या ‘इये निबंधाचिये नगरी’ या निबंध लेखन संग्रहात खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे निबंध वाचनाने आजचे विद्यार्थी निबंध स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत व स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात. म्हणून सदरचे पुस्तक सर्वांनी वाचावे, असे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग व किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र तसेच समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बहू भाषिक साहित्य संमेलन मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे संपन्न झाले. या संमेलनामध्ये प्रा. नागेश कदम यांच्या ‘इये निबंधाचिये नगरी’ या निबंध लेखन पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रा. नागेश कदम यांना महाराष्ट्र शैक्षणिक सेवा रत्न पुरस्कार आयोजकांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर आर्किटेक्चर नीलिमा गुप्ता, डॉ. दीपक परब, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अ. ना. रसनकुटे, डॉ. राजश्री खटावकर, डॉ. अच्युत सोमवंशी, दिग्दर्शक संजय मोहिते सुप्रसिद्ध गझलकार अजय नाईक, समृद्धी प्रकाशनचे संचालक डॉ. बी. एन. खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
