संविधानानुसार देश चालणे आवश्यक…

कल्पना मलये यांचे प्रतिपादन : भरणी येथे संयुक्त जयंती महोत्सव..

⚡कुडाळ ता.२८-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी फार मोठे कार्य केले. संविधानाद्वारे त्यांनी सर्व भारतीयांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करुन दिला आहे. संविधानानुसार देश चालणे ही काळाची गरज आहे. डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते की संविधान कितीही चांगले असले तरी ते राबविणारी व्यक्ती जर चुकीची असेल तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील, असे प्रतिपादन कवयित्री तथा शिक्षिका कल्पना मलये यांनी केले.


भरणी बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण शाखा, पंचशील महिला मंडळ भरणी-बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव कुडाळ तालुक्यातील भरणी बौद्धवाडी आयोजित केला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कदम, भरणीच्या सरपंच अश्‍विनी मेस्त्री, उपसरपंच दिलीप कदम, नंदन घोगळे, दर्पण प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, कुडाळ तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव विनोद तांबे, धम्म उपासक सुशील कदम, कास्ट्राईब शिक्षक संघ महासचिव किशोर कदम, कवी सिद्धार्थ तांबे, सुनील तांबे, दर्पण महिला फ्रंटच्या स्नेहल तांबे, कुडाळ तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव संजय कदम, शिक्षक किशोर तांबे, संस्थेचे सचिव प्रथमेश कदम, निवेदक राजेश कदम आदी उपस्थित होते.
मलये म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेला आणि जातीव्यवस्थेला हादरा दिला होता. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनुसार महिलांनी वाटचाल करणे नितांत गरजेचे आहे. महिलांनी जागरूकतेने कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडता नये. महिलांनी आपले जगणे संविधानातील तत्त्वानुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा अंगिकार करून प्रज्ञाशील, करूणा या धम्म विचारांशी बांधील राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत कदम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि धम्मचळवळीत क्रांतीकारी विचार समाजातील तळागाळापर्यंत रुजविण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी सर्व संस्थांनी व युवा पिढीने पुढाकार घेवून निःस्वार्थी वृत्तीने कार्य करण्याची गरज आहे. यावेळी अश्‍विनी मेस्त्री, दिलीप कदम यांचा सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त नंदन घोगळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुशील कदम, राजेश कदम यांचाही सन्मान करण्यात आला. सिद्धार्थ तांबे, आनंद तांबे, सुशील कदम यांनी मनोगते केली. प्रास्ताविक मंगेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले. आभार सुशांत कदम यांनी मानले. आरंभी कोरोनाच्या काळात निधन झालेल्या मंडळाच्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून कुडाळ येथील गौरी बांदेकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीची स्पर्धा पार पडली. यात रसिका कदम या पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी देण्यात आली. उपविजेत्या ठरलेल्या कादंबरी कदम आणि तन्वी तांबे यांचाही बक्षीस देण्यात आली. त्यानंतर नितीन बांदेकर प्रस्तुत बुद्ध-भीमगीते, हिंदी मराठी गीतांचा आणि नृत्यांचा सदाबहार संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम गायिका पृथ्वी तांबे हिचाही सन्मान करण्यात आला. पृथ्वी हिने आपल्या पहाडी गायनाने रसिकांची मने जिंकली. नितीन बांदेकर यांचे संगीत संयोजन आणि गौरी बांदेकर यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. हा संयुक्त जयंती महोत्सव यशस्वी होण्यासाठी भरणी बौद्ध विकास मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page