तात्काळ दुरुस्ती करा: वाहनधारकांची मागणी..
⚡मालवण ता.१९-:
मालवण- आचरा रस्त्यावरील आचरा भगवंतगड फाटा (शिक्षक कॉलनी) ते चिंदर काजरा देव मार्ग पूर्णतः खड्डेमय बनला आहे. सुमारे दोन ते तीन कि.मी. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालकांना या मार्गाने वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
आचरा भगवंतगड फाटा (शिक्षक कॉलनी) ते चिंदर काजरा देव हा मार्ग आचरा ते बांदिवडे मसुरे तसेच जिल्हा मुख्यालय पर्यंत जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. अलीकडच्या काळात या मार्गावरून वाहतूक मोठया प्रमाणात वाढली आहे. शाळा- कॉलेज, नोकरदार वर्ग, हॉस्पिटलमध्ये जाणारे रुग्ण या मार्गाने प्रवास करत असतात. मात्र या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्याचा फटका या मार्गावरून ये- जा करणाऱ्या शेकडो वाहनधारकांना बसत आहे. या मार्गाने जाणारे दुचाकी, रिक्षा, कार आदी वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची भीती निर्माण असून लोकप्रतिनिधी व प्रशासन या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देतील का ? असा प्रश्न वाहनचालक व जनतेतून विचारला जात आहे.
