प्राथमिक शिक्षक संघाची मागणी..
सिंधुदुर्गनगरी ता १७
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ही आचारसंहिता शिथील करून प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचा मार्ग मोकळा करावा. अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिंधुदुर्ग, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर व जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये होतात. गेली दोन वर्ष बदल्या झालेल्या नाहीत. यासंबंधीचा आदेश दिनांक २१ जून २०२३ रोजी झालेला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून १० मार्च २०२४ पासून कार्यवाही सुरू झालेली होती. मात्र १५ मार्च २०२४ पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने बदलीची प्रक्रिया थांबविण्यात आली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील मतदान प्रक्रिया ७ मे २०२४ रोजी संपन्न झालेली आहे. त्याला अनुसरून मा. निवडणूक आयोगाने शिक्षक भरतीसाठी परवानगी दिलेली आहे. ही बाब मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे – १ यांनी दिनांक १९ एप्रिल २०२४ चे पत्राने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना कळविलेली आहे. मात्र भरतीपूर्वी बदल्या कराव्यात असे दिनांक २१ जून २०२३ च्या आदेशात असूनही केवळ निवडणूक आयोगाची परवानगी नसल्याने दरवर्षी होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या खोळंबल्या आहेत.
तरी याबाबत आमची समस्या माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांना कळवून मतदान झालेल्या ठिकाणी आचारसंहिता शिथील करून कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास परवानगी प्राप्त करून द्यावी. अशी विनंती करणारे निवेदन आज अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधूदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
