⚡कणकवली ता.१६-: फोंडाघाट मृद व जलसंधारण विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडून सावडाव धरणाचे काम सुरु आहे . सदर काम शेतक-यांना जमीन भुसंपादनाचा मोबदला न देताच केवळ संयुक्त मोजणीची नोटीस देत काम सुरु केले. धरणग्रस्त शेतक-यांनी गुरुवारी थेट धरण परिसरात जावून ठेकेदाराला जाब विचारत काम बंद पाडले. वडीलोपार्जित असलेल्या आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर दांडगाईने ठेकेदाराने काम सुरु केले आहे.
गुरुवारी संतप्त शेतकऱ्यांनी मशिनरी, डंपर धरण परिसरातून बाहेर काढायला भाग पाडले. या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष कन्हैया पारकर व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी सावडाव धरण प्रकल्पग्रस्त वैभव सावंत, नयना सावंत, विष्णू झगडे, आनंद नरसाळे, विद्याधर वारंग, संभाजी तेली, बाळकृष्ण चव्हाण, संदीप खांदारे, सतीश मोरे यांच्यासह शिवसेना उबाठा गटाच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम पालव सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजु राठोड, दिव्या साळगांवकर, माधवी दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमचा धरणाला विरोध नाही – प्रकल्पग्रस्त शेतकरी
शेतक-यांना किती आणि केव्हा मोबदला मिळणार याबाबत कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही. केवळ संयुक्त मोजणी करण्याबाबत नोटीसा शेतक-यांना देण्यात आल्या . मात्र येथील नुकसान भरपाई काय मिळणार कोणत्या स्वरुपात मिळणार ? याबाबत स्पष्ठ लेखी दिलेले नाही. ठेकेदाराला हाताशी धरुन अधिका-यांनी शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला.
शिवसेना उबाठा पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार : कन्हैया पारकर
यावेळी शिवसेना उबाठा पक्षाकडून या शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आला. आमचा धरणाला विरोध नसून मुळ शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात आणि जमीनीचा मोबदला शेतकऱ्यांना न देता जमीनीमध्ये धरणाचे जे काम चालु आहे. ते चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. त्याचे मूल्यांकन न करताच झाडे व जमीन उदध्वस्त करण्याचे काम केल जात आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व खा. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढील काळात आम्ही शेवटपर्यंत राहणार आहोत. अधिकारी आणि ठेकेदाराने धरणाचे काम करत शेतकऱ्यांची फसवणूक केली. केवळ या ठेकेदारीतून पैसे खाण्यासाठी केलेला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाय तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी दिला. दरम्यान, सावडाव धरणाचे काम बंद पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी धरण परिसराच आंदोलन छेडले. ठेकेदाराच्या प्रतिनीधीला आमचा मोबदला मिळाला नसल्याने काम बंद करा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. परंतु ठेकेदार मानत नसल्याने शेतकऱ्यांनी गांधीगीरी करत ठेकेदाराचे चक्क पाय धरले.
