सुजाता शेलटकर:अष्टपैलू कलानिकेतन, मालवण संस्थेतर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान..
⚡मालवण ता.१५-:
रंगभूमीवरील आजवरच्या योगदानात माझ्यासाठी प्रेक्षकांचे आशीर्वाद महत्वाचे ठरले. या प्रवासात अनेकांची साथ आणि मदत लाभली. अष्टपैलू कलानिकेतन संस्थेने आज माझा केलेला गौरव हा आनंद देणारा आहे, यापुढेही मी रंगभूमीची, कलेची सेवा करत राहीन, असे प्रतिपादन मालवणच्या ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री सुजाता शेलटकर यांनी येथे बोलताना केले.
अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा आणि या स्पर्धे दरम्यान देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराचा वितरण सोहळा मंगळवारी सायंकाळी मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात संपन्न झाला. यावेळी संस्थेतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार मालवणच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री सुजाता शेलटकर यांना प्रदान करण्यात आला. प्रमुख अतिथी मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. दत्तप्रसाद खानोलकर यांच्या हस्ते सुजाता शेलटकर यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, मानधन थैली, साडी, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच मे. केशव यशवंत मालंडकर ज्वेलर्सचे मालक शैलेश मालंडकर यांच्यातर्फे शेलटकर यांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र केळूसकर, उपाध्यक्ष सुनील परुळेकर, ऍड. दिलीप ठाकूर, संतोष शेजवलकर, परीक्षक संजय धूपकर, केशव पणशीकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भालचंद्र केळूसकर यांनी केले. तर जीवनगौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन सौ. रश्मी रत्नाकर सामंत यांनी केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे दत्तप्रसाद खानोलकर म्हणाले, वेशभूषा, अभिनय व संगीत यांचा त्रिवेणी संगम असलेली नाट्यगीत गायन स्पर्धा अष्टपैलू कलानिकेतन ही संस्था घेत आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आजची तरुण पिढी संगीत व नाट्य संगीत यांच्यापासून दूर चालला आहे. त्यांना प्रवाहामध्ये आणणे गरजेचे आहे. त्यामुळे ही स्पर्धा स्तुत्य असून यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. तसेच यानिमित्ताने नाट्यक्षेत्रात महत्वापूर्ण योगदान देणाऱ्या अभिनेत्री सुजाता शेलटकर यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी केलेली निवड व त्यांचा केलेला गौरव अतिशय सार्थ आहे, असेही खानोलकर म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कुर्ले यांनी केले. तर आभार बाळू काजरेकर यांनी मानले. यावेळी अष्टपैलू कालानिकेतनचे सदस्य तसेच नाट्य व संगीत प्रेमी नागरिक उपस्थित होते.
