पावसाळयापूर्वी तालुक्यातील सर्व भागातील विजवाहीनी वरील झाडांच्या फांदया तोडावे…

अशोक दळवी: वीज वितरणचे अभियंता यांच्याकडे निवेदन केले सादर..

⚡सावंतवाडी ता.१३-: पावसाळयापूर्वी तालुक्यातील सर्व भागातील विजवाहीनी वरील झाडांच्या फांदया तोडणे गरजेचे असताना आपल्या कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे. ही बाब गंभीर असून याची दखल घेणे गरजेचे आहे. तसेच कोकणांतील पाऊस हा मुसळदार असल्याने सर्वच जनजिवन विस्कळीत होते. त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण भागातील ब-याच भागामध्ये विद्युत लोखंडी पोल सडलेले असल्याने मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्याहीदृष्टीने आपल्या महावितरण कंपनी मार्फत त्वरीत कार्यवाही व्हावी अशी मागणी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी वीज वितरण चे व अभियंता कुमार चव्हाण यांच्याकडे केली.

श्री दळवी यांनी याबाबतचे निवेदन वीज वितरणला दिले असून त्यात असे म्हटले की,गेले दोन दिवस पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याची जाणीव आपल्या महावितरण कंपनीला माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्ष जबाबदारी म्हणुन आपले अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत, रोजंदारी कामगार यांच्यावर जाणीवपुर्वक जबाबदारी टाकुन अधिकारी आपली जबाबदारी टाळताना दिसतात, हि वस्तुस्थिती सत्य असून, रोजंदारी कामगारांना ग्राहकांशी तसेच ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. त्यात अधिकारी आपल्या कर्तव्यात कसुर करीत आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्राहक व ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला आहे. याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहे. याबाबतीत ग्राहक व ग्रामस्थ यांच्यामार्फत काही चुकीच्या गोष्टी घडल्यास त्याला आपले कार्यालयच जबाबदार राहील.
वरील याबाबतीत आपल्या कार्यालयाकडून त्वरीत आठ दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास ग्राहक व ग्रामस्थांच्या रोषाला आपण कारणीभुत ठराल, प्रसंगी आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असेही म्हटले आहे.

You cannot copy content of this page