जादा मतदानाचा फायदा आम्हाला होईल…

आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला विश्‍वास..

⚡कणकवली ता.०७-: 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवे होते. त्यामुळे मतदारांनी खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले. मात्र, मागील 10 वर्षांत राऊत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही विकासात्मक काम केले नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने राऊत यांचा पराभव करून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याचे ठरवले आहे. या मतदारसंघात झालेल्या जादा मतदानाचा फायदा महायुतीला होईल, असा विश्‍वास आमदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.


रत्नागिरी व सिंधुदुर्गातील मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. हे चांगले वातावरण असून दोन्ही जिल्ह्यात झालेले वाढीव मतदानाचा फायदा नारायण राणे यांना होणार आहे. कोकणात जर आपल्याला परिवर्तन घडवायचे असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकास घडवायचा असेल तसेच ज्यांनी 35 वर्षे नि:स्वार्थीपणे कोकणाची सेवा केली त्यांना अजून पुढची 5 वर्षे सेवा करण्याची संधी देऊन तुमच्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी नारायण राणेंना विजयी करणे आवश्यक आहे. गेली दहा वर्ष येथील विकास थांबला होता, येथील खासदार कोठे होते? असा सवाल करतानाच 2014 व 2019 मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हवे होते म्हणून विनायक राऊत यांना तुम्ही मतदान केले. मात्र, आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मतदान करून मोदींचे हात बळकट करण्याची आवश्यकता आहे, असेही श्री. राणे म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच माजी खासदार नीलेश राणे या सर्वांच्या संपर्कात असून मतदानाला सर्वत्र अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.
किरण सामंत नॉट रिचेबलच्या मुद्द्यावर ते मतदारसंघात होते. काही ठिकाणी नेटवर्क नसल्याने नॉट रिचेबल फोन येतो. मीही दुपारी देवगड तालुक्यात होतो तेथेही काही भागात नेटवर्क नव्हते मग मीही नॉट रिचेबल म्हणायचे का? अनेक ठिकाणी बीएसएनएल असेल जिओ असेल यांचे नेटवर्क नाही हे नेटवर्क आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे आणि हे काम नारायण राणे यांच्या माध्यमातून करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार आपल्याला हवे आहे, असे राणे म्हणाले.

You cannot copy content of this page