देवगडच्या महिलांनी समई नृत्य सादर करून मिळविली वाहव्वा..
⚡मालवण ता.०४-:
चुनवरे येथील श्री देव जैन रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने गेले पाच दिवस आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी अलोट गर्दी केली. यानिमित्ताने सादर करण्यात आलेल्या समई नृत्य कार्यक्रमाला तसेच दशावतार आणि भजनबारी यांना रसिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवीत दाद दिली. तर महिला वर्गासाठी आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सौ. साची सचिन तळेकर हिला मानाची पैठणी देण्यात आली.
मालवण तालुक्यातील चुनवरे येथील श्री देव जैन रामेश्वर मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने गेले पाच दिवस चुनवरे गावात धार्मिक कार्यक्रमा बरोबरच सांस्कृतिक महोत्सव पार पडला. चुनवरे येथील विश्राम प्रेरणा मंडळ प्रायोजित श्री. बबन परब आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला ७१ महिलांनी सहभाग दर्शवीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध चातुर्यपूर्ण खेळाद्वारे सोळा महिलांनी अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर प्रथम पाच महिलांना पैठणी देण्यात आल्या. तर उर्वरित अकरा जणांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या होम मिनिस्टर मध्ये साची सचिन तळेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर वर्षा तुषार परब यांनी द्वितीय आणि मयुरी शैलेश बागवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेत रितिका बुधाजी सावंत आणि सपना संतोष परब यांनी अनुक्रमे चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकावला. तसेच स्नेहल समीर परब, अनुजा धोंडी परब, निर्षा निखिल चांदे, प्रियांका सागर परब, पूर्वा प्रथमेश परब, सुचिता प्रमोद परब, दीक्षिता दिगंबर परब, धनश्री धनाजी पालव, स्वाती गणेश परब, वैशाली निर्गुण, आंचल बाणे आदींनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक प्रभाकर परब, बाळकृष्ण परब, गणेश परब, सरपंच सौ. श्रेया महेश परब, श्री देव जैन रामेश्वर, तिठाई मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बापू परब, विश्राम प्रेरणा मंडळाचे कार्याध्यक्ष यशवंत सावंत, ग्रामसेवा मंडळ चुनवरे मुंबईचे अध्यक्ष सोनू परब, विश्राम प्रेरणा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत परब, जयवंत सावंत, दिलीप सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेला पंच म्हणून सरपंच सौ. श्रेया परब तर सहाय्यक म्हणून कु. निकिता सावंत यांनी काम पाहिले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय परब यांनी केले. या उत्सवाच्या निमित्ताने देवगड येथील महिलांनी समई नृत्य सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली.
