विकासावर खा. राऊतांनी माझ्याशी डबलबारी करावी…

माजी आमदार प्रमोद जठार यांचे आव्हान ः कोकणच्या विकासासाठी नारायण राणेंना निवडून द्यावे..

⚡कणकवली ता.०४-: तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सीएसआर फंडातून खासदार विनायक राऊत यांनी सांगितली दोन स्वच्छतागृहे मंजूर केली नाहीत. त्यामुळे राऊतांनी कोकणातील दोन लाख बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला.

परिणामी हा प्रकल्प रखडला. रिफायनरी प्रकल्पातून तयार होणाऱ्या पेट्रोल, डिझेल, गॅस अन्य बायप्रोडक्टचा वापर उद्धव ठाकरे, विनायक राऊत व बेगडी पर्यावरणप्रेमी करीत आहेत. त्यांनी आधी या बायप्रोडक्टचा त्याग करावा, त्यानंतरच रिफायनरी प्रकल्पाला विरोध करावा. विनायक राऊतांनी मागील 10 वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 केलेली विकासात्मक कामे आम्हाला दाखवावीत व त्यांनी विकासाच्या मुद्यावर माझ्याशी खुलेआम डबलबारी करावी, असे आव्हान माजी आमदार तथा भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख प्रमोद जठार यांनी दिले.
येथील प्रहार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. जठार बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपचे प्रसिद्ध प्रमुख बबलू सावंत उपस्थित होते. जठार म्हणाले, कणकवलीतील जाहीर सभेत महाराष्ट्रातील प्रकल्प भाजपने गुजरातला पळवले, असा आरोप उद्धव ठाकरे व विनायक राऊत यांनी आरोप होता. त्यांचा हा आरोप बिनबुडाचा आहे. गुजरातमध्ये खासगी रिफायनरी प्रकल्प झाल्यामुळे तेथील बेरोजगारांना रोजगार मिळून अंबानी व सरकार श्रीमंत झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे रिफायनरी प्रकल्प झाला असता तर कोकणातील 2 लाख बेरोजगारांना रोजगार मिळला असता आणि नाणारमधील लोक श्रीमंत झाले असते. मात्र, राऊतांनी उद्धव ठाकरे यांना या प्रकल्पाबाबत चुकीची माहिती देत प्रकल्पास विरोध करण्यास भाग पाडले. आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासह सेनेच्या स्थानिक पदाधिकारी यांचा रिफायनरी प्रकल्पास समर्थन आहे. केवळ राऊत यांचा या प्रकल्पास विरोध असल्याचे जठार यांनी सांगितले. वेंगुर्ले येथील पाणबुडीचा प्रकल्प पळविल्याचा आरोप शिवसेना उबाठातील नेते मंडळींकडून केला जात आहे. त्यांचा हा आरोप खोटा असून सदर प्रकल्प काही तांत्रिक अचडणींमुळे रखडला असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले.
भारतद्वेषी व परकीय शक्तींसाठी मोदींचे नेतृत्व डोईजड होत असल्याने ही शक्ती उद्धव ठाकरे व त्यांच्या फौजेला आर्थिक रसद पुरवत असून या शक्तीच्या हातातील ठाकरे हे बाहुले झाले आहे, असा गंभीर आरोप जठार यांनी केला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना दोन दिवसही मंत्रालयात गेले नाही व त्यांना प्रशासनाचे कोणतेही ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना बिफरींग करणारी मंडळी चुकीची माहिती देत असतात त्या माहितीच्या आधारे उद्धव ठाकरे हे भूमिका घेत असल्याने पक्षाला व त्यांना नुकसान सोसावे लागले. 40 आमदार सोडून गेले हे त्याचे उदाहरण आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अन्य महापुरुष ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही तर जनतेची प्रॉपर्टी आहे, असा टोला जठार यांनी ठाकरेंना लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या वासशाचे खरे वारसदार राज ठाकरे, नारायण राणे आहेत. नेतृत्व हे वारशा हक्काने मिळत नाही तर ते तयार करावे लागेत, असे टीकास्त्र जठार यांनी ठाकरेंवर सोडले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पीएम, उद्धव ठाकरे यांना सीएम, विनायक राऊतांना एमपी होण्याची घाई असून त्यांच्या हातून विकासात्मक कोणतेही काम होणार नाही, असा टोला जठार यांनी लगावला. त्यामुळे कोकणाच्या विकासासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना जनतेने निवडून दिले पाहिजे. कारण राणे यांच्याकडे कोकणाच्या विकासाचा अजेंडा आहे, तर राऊत यांच्याकडे कोकणाच्या विकासाचा अजेंडा नाही. कोकणी जनतेने राऊत यांना लोकसभेत पाठवले तर कोकणाच्या विकासाला ब्रेक लागेल, असे जठार म्हणाले.
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी प्रकल्प, मुंबई-गोवा माहामार्ग चौपदरीकरणाचा प्रकल्प, आंनदवाडी प्रकल्प हे आपण मार्गी लावले असून राऊत हे या प्रकल्पांचे फुटकचे श्रेय घेत आहेत. सिडकोच्या माध्यमातून कोणातील जमिनी परप्रांतियांच्या ताब्यात देण्यात डाव असल्याचा आरोप ठाकरेंची फौज करीत आहेत. मात्र, हे आरोप धादांत खोटे आहेत. ठाकरेंची फौज ही लबाड लांडग्यांसारखी आहे, अशी टीका जठार यांनी केली. राऊत यांनी मागील 10 वर्षांत काजू व आंबा उत्पादकांचे प्रश्‍न व या पिकाला हमीभाव देण्याचा मुद्दा लोकसभेत व्यवस्थित न मांडल्यामुळे हे प्रश्‍न निकाली लागू शकले नाहीत. हे राऊत यांचे पाप आहे, असे जठार म्हणाले.

You cannot copy content of this page