गुजराती बांधवांचे मेळावे हा षडयंत्राचा भाग…

सुशांत नाईक यांची राणेंवर टीका:रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध कमी होत नसल्यामुळे भाजपने नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले…

⚡कणकवली ता.०२-: केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी कणकवलीमध्ये गुजराती बांधवांचा मेळावा घेतला आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्येही मेळावा घेतला. त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतलेले गुजराती बांधवांचे मेळावे हे एका व्यापक षडयंत्राचा भाग आहेत. कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीवर आणि इथल्या जमिनींवर गुजराती लँड माफीयांचा पहिल्यापासूनच डोळा आहे. आता कोकणची किनारपट्टी त्यांना बहाल करण्यासाठी नारायण राणेंना भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. गुजराती लँडमाफीयांसाठी ते तारणहार आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणच्या मातीचे रक्षण करायचे असेल तर लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करणे ही काळाची गरज आहे, अशी टीका उबाठा गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यापासूनच गुजरात्यांचा महाराष्ट्रावर असलेला आकस लपुन राहिलेला नाही. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोन गुजराती केंद्रात सत्तेवर आल्यामुळे महाराष्ट्रावर आकस ठेवुन मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन वेदांता फॉक्सकॉनसारखा तीन लाख कोटींचा लाखो मराठी युवकांना रोजगार देण्याची क्षमता असलेला प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथून गुजरातला पळविण्यात आला. त्याचवेळी रिफायनरी सारखा कोकणच्या निसर्गरम्य पर्यावरणाचा विध्वंस करणारा विनाशकारी प्रकल्प कोकणातील जनतेचा प्रखर विरोध असतानाही भाजप सरकारकडून माथी मारला जात आहे. नारायण राणेंनी सुरुवातीला रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला. आमदार नितेश राणेंनी रिफायनरी विरोधात मंदिरात देवगड येथील रामेश्वर मंदिरात घंटानाद आंदोलन केले, शपथा घेतल्या. शेवटी भाजपने हा महत्वाकांक्षी प्रकल्प रेटण्यासाठी नारायण राणेंना राज्यसभेतुन खासदारकी दिली. ही खासदारकी म्हणजे रिफायनरी प्रकल्पासाठी मध्यस्थीची भूमिका घेण्यासाठीचा भाजपने प्रयत्न केला होता.

खासदारकी मिळतात राणे कुटुंबीयांनी पुर्णपणे यु-टर्न घेऊन स्थानिक ग्रामस्थांााा टोकाचा विरोध असताना विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात रेटण्याचा पुर्ण प्रयत्न केला. त्यानंतरही रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध कमी होत नसल्यामुळे भाजपने नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले. त्यांनी आपल्या परीने रिफायनरी प्रकल्प रेटायचा पुरेपुर प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी शिवसेना व खासदार विनायक राऊत ठामपणे उभे राहिल्यामुळे राणेंना रिफायनरी प्रकल्प रेटणे शक्य झाले नाही.
रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणार्‍या पत्रकाराचा मृत्यू झाला. हा मृत्यू म्हणजे घातपात होता व त्या पाठीमागे कोणाचे कार्यकर्ते होते हे सर्वज्ञात आहे. मातीपरीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला. त्याठिकाणी ग्रामस्थांवर पोलीसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आणि अश्रुधुराचे गोळे सोडण्यात आले. एखाद्या मोठ्या पदासाठी विनाशकारी प्रकल्प रेटायची ही नारायण राणेंची पहिलीच वेळ नव्हे. काँग्रेसमध्ये असताना विनाशकारी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रेटण्याच्या बदल्यात नारायण राणेंनी काँग्रेस पक्षाकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनात पोलीसांकरवी गोळीबार केला होता. केंद्रीय मंत्रीपदाच्या स्वार्थासाठी गुजराती लॉबीचे कोकणातील पाळीमुळे रोवून देण्यासाठी नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. रिफायनरी परिसरात जमीन खरेदी करणार्‍यांमध्ये गुजरातींचा समावेश असून त्यांच्या नावांसहीत यादी आमायाकडे आहे. या सर्व गुजराती लँड माफियांवर नारायण राणेंचाच वरदहस्त आहे. कोकणातील जमीन स्वस्त दरात खरेदी करून ती कालांतराने मोठ्या प्रकल्पासाठी चढया भावाने विकायची यासाठी गुजराती लँड माफीयांची कोकणच्या किनारपट्टीवर वक्रदृष्टी पडलेली आहे. त्यांना नारायण राणेंसारखा खासदार भेटला तर भविष्यात कोकण किनारपट्टी गुजरात्यांच्या ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही. या गुजराती लॉबीला वेळीच आवर घालण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचा मोठ्या मताधिक्याने पराभव करावा लागेल, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page