मालवण दि प्रतिनिधी
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे शिवसेना इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ मालवण शहरा बरोबरच तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी घरोघरी प्रचार कार्यावर जोर दिला असतानाच छोट्या छोट्या बैठकांमधूनही खासदार विनायक राऊत यांचा दहा वर्षातील कार्याचा अहवाल मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आघाडी घेतली आहे. मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि शहर प्रमुख बाबी जोगी यांच्या नेतृत्वाखाली प्रचार कार्य जोमाने सुरु असून युवासेनेचे पदाधिकारी मंदार ओरसकर यांनीही प्रचारास हिरीहीरीने भाग घेतला आहे.
इंडिया महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत. जिल्ह्यात कडाक्याचे ऊन असून अंगाची लाही लाही होत घामाच्या धारा वाहत असताना देखील कार्यकर्ते याची पर्वा न करता आणि रुपयाचीही अपेक्षा न बाळगता मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. सिंधुदुर्गात दहशत निर्माण करणाऱ्यांना या निवडणुकीत कायमचे हद्दपार करून विनायक राऊत यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. हेच निष्ठावंत शिवसैनिकांचे शिवसेनेवर आणि उद्धव साहेबांवर असलेले प्रेम आहे. निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले असून आमदार नाईक शिवसैनिकांसमवेत प्रचारात उतरून त्यांचे मनोबल वाढवीत आहेत.
मालवण तालुक्यात आज ठिकठिकाणी शहर व ग्रामीण भागात ठाकरे शिवसेनेच्यावतीने प्रचारफेऱ्या काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आमदार नाईक हे सहभागी होत शिवसैनिकांना प्रचाराबाबत मार्गदर्शन करीत होते. यावेळी बोलताना श्री. नाईक म्हणाले की, पक्ष, आमदार, खासदार फोडणे हे भाजप, महायुती आणि एनडीएतील घटकपक्ष असलेल्या ईडी आणि सीबीआयचे काम सुरूच असते. मात्र, महाविकास आघाडी सातत्याने महाराष्ट्र हित आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत बोलत आहे. महाराष्ट्रातून उद्योगधंदे राज्याबाहेर का जोत आहे. कृषीक्षेत्र अडचणीत का आहे, दोन वर्षांपासून राज्याचा विकास का झाला नाही यावर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र, या मुद्यांवर चर्चा करण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे काही विरोधक आमच्याविरोधात बोलण्यासाठी पाठवत आहेत. त्यामुळे -अशा लोकांना आपण महत्त्व देत नाही, असेही श्री. नाईक यांनी स्पष्ट केले. आता भाजप धार्मिक मुद्यांवर बोलत आहे. जेव्हा-जेव्हा भाजप मागे पडते, तेव्हा ते धार्मिक विषय आणायचा प्रयत्न करतात. असे मुद्दे उचलून विनाकारण धर्माधर्मात, जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आम्ही महाराष्ट्र म्हणून एकत्र आहोत आणि महाराष्ट्र हिताचेच बोलत राहणार आहोत, असेही श्री. नाईक म्हणाले.
