नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरात नगरपालिका प्रशासनाचे स्वच्छतेबाबत नियोजन नाही, बायो टॉयलेट गाड्या वापराविना, सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन, डास फवारणी बंद, पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, फोवकांडा पिंपळ येथील बंद फाउंटन, भाजी मार्केट तसेच मल्टीपर्पज हॉल काम बंद, मासे मार्केटवरील गाळे लिलाव नाही, अशा शहरातील विविध समस्या बाबत वारंवार सूचना करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत लक्ष वेधले आणि योग्य ती कार्यवाही प्रस्तावित करावी, अशी मागणी केली.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी उपगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक गणेश कुशे आदी उपस्थित होते.
मालवण नगरपालिकेत सध्या मुख्याधिकारी म्हणून संतोष जिरगे हे कार्यरत आहेत. त्यांच्याकडेच प्रशासक पदाचा कार्यभार आहे. आमचा नगरपालिकेमधील पाच वर्षांचा कार्यकाल २० डिसेंबर २०२१ ला संपला आहे. प्रशासकीय कार्यकाळाला आता दोन वर्ष पूर्ण होत आली. आमच्या वेळी शहरात निर्माण केलेल्या स्वच्छता व्यवस्थेचा गेल्या दोन वर्षात बोजवारा उडाला आहे. लाखो रुपये खर्च करून आणलेल्या कचऱ्यापासून खत निर्मितीच्या मशीन बंद पडल्या आहेत. कचरा गाड्या बंद आहेत. ट्रॅक्टर द्वारे कचरा वाहतूक होत असून त्यावर कोणाचाही अंकुश नाही. डम्पिंग ग्राउंड मध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. वेंगुर्ला नगरपालिका प्रशासकीय कालावधीतही स्वच्छतेत बक्षीस पात्र कामगिरी करत असताना मालवण नगरपालिका कितव्या क्रमांकावर गेली आहे याचे आत्मपरीक्षण मुख्याधिकाऱ्यांनी केले पाहिजे. गेल्या दोन वर्षात मुख्याधिकारी यांच्या मर्यादा जनतेसमोर आल्या असून कामचुकार केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवर वैयक्तिक कारवाई करण्याचा शासन निर्णय झाला पाहिजे अशी मागणी कांदळगावकर यांनी निवेदनात केली आहे.
तसेच मालवण शहरात आणलेल्या बायोटॉयलेट गाड्या वापराविना आणि देखभाली विना गेली तीन वर्षे धूळखात पडून आहेत. शहरात डासांची संख्या वाढली असताना डास प्रतिबंधक फवारणी बंद आहे. शहरात २५ लाख रुपये खर्चून पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात आली, मात्र ते चालविण्यास देण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया झालेली नाही. शहरात २५ लाख रुपये खर्चून दिशादर्शक बसविले, मात्र ते चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने त्याचा फटका पर्यटकांना बसत आहे, त्याबाबत ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. कोट्यावधी रुपये खर्चून रॉक गार्डन येथे बसविलेला म्युझिकल फाउंटन व फोवकांडा पिंपळपार येथील कारंजा आज बंद अवस्थेत आहेत. भाजी मार्केट व मल्टीपर्पज हॉलच्या कामाचे काम बंद पडले आहे. तसेच मासे मार्केटवरील गाळ्यांचा अद्यापपर्यंत लिलाव केलेला नाही, अशा विविध समस्या व तक्रारी महेश कांदळगावकर यांनी निवेदनातून मांडल्या आहेत.
.
मालवण शहरात मागील वर्षभरात विकास कामे, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट व्यवस्था इत्यादी बाबत कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याबाबत वेळोवेळी सूचना करून, लेखी देऊनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. नगरपालिकेची निवडणूक न झाल्याने अजूनही आमच्या कालावधीतील लोकप्रतिनिधी कडून लोकांच्या कामाच्या अपेक्षा आहेत. आणि आमची ती नैतिकता पण आहे. काम न झाल्यास ते अजूनही आम्हालाच जबाबदार धरणार आहेत. तरी नगरपालिकेच्या एकंदरीत प्रशासकीय कारभाराबाबत माहिती घेऊन आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावेत, अशी मागणी मागण्यांचे श्री. कांदळगावकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
