गेली दहा वर्षे खासदारकीचा वापर जनकल्याणासाठी केला…

खा विनायक राऊत:सिंधुदुर्गनगरी येथे प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी ता २१-:खासदारकीचा मिजास मिरविण्यापेक्षा खासदारकीचा वापर आपण गेली १० वर्षे जनकल्याणसाठी केला याचे आपल्याला समाधान आहे. २०१४, २०१९ नंतर आता २०२४ मध्येही आपला विजय निश्चित असून विरोधकांनाही ते माहीत आहे. त्यामुळे आपल्या विरोधात कमीत कमी मताने कोणता उमेदवार पडेल, याची चाचपणी विरोधक करत असल्याचा टोला खा विनायक राऊत यांनी आज त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विरोधकांना लगावला.

इंडिया महविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खा. विनायक राऊत यांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खा. विनायक राऊत यांच्या हस्ते फीत कापून आणि आ. वैभव नाईक यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी माजी आ. प्रवीण भोसले, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी काँगेसच्या विभागीय महिला जिल्हाध्यक्षा अर्चना घारे, विकास सावंत, सतीश सावंत, जयेंद्र परुळेकर, जान्हवी सावंत, संग्राम प्रभुगावकर, अनंत पिळणकर, नागेंद्र परब, सुशांत नाईक, सुकन्या नरसुले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना आ. वैभव नाईक यांनी, खा. विनायक राऊत हे पुन्हा लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच गेली १० वर्षे त्यांनी येथे हक्काचे कार्यालय निर्माण करून नागरिकांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. येथे येणारा एकही नागरिक निराश किंवा खाली हाताने गेला नाही. विविध माध्यमांतून अनेक सर्व्हे होत आहेत. मात्र नागरिकांच्या सर्व्हेत विनायक राऊत हेच पुन्हा एकदा खासदार होणार असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे अन्य जिल्ह्यात केंद्रीय मंत्र्याना उमेदवारी जाहीर झाली मात्र आपल्या जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री उमेदवारी साठी दारोदारी फिरत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रीय काँग्रसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले की, लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी खा. राऊत यांचे आघाडीचे उमेदवार म्हणून एकमताने नाव जाहीर झाले तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला आहे. मात्र दुसरीकडे बाकीच्यांना उमेदवारच मिळत नाही ही शोकांकिता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्याच्या अंगी नम्रता आहे , असा जमिनीवर असलेला खासदार अशी त्यांची ओळख आहे असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी शरद पवार यांच्यासाठी खा. राऊत यांना पुन्हा निवडून आणायचे आहे. गुलाल आपल्यालाच उधळायाचा आहे असे यावेळी स्पष्ट केले.
अर्चना घारे यांनी सर्व सामान्य माणसावर जीव अर्पण करणारा खासदार कोण असेल तर ते विनायक राऊत हे आहेत. त्यांना प्रत्येक घराघरात ओळखले जात आहे. मोदी लाट आता सुस्त लाट होत असल्याचे यावेळी सांगितले.
खा. विनायक राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, खासदारकीची मिजास मिरविण्यापेक्षा खासदारकीचा वापर जनकल्याणसाठी करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. हुकुमशाहीकडे देश जात आहे. लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न हुकुमशाही विद्यमान सरकारकडून केला जात आहे. संविधानाचा बट्ट्याबोळ सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाला सत्ताधारी जुमानत नाहीत. जनतेला न्याय देण्यापेक्षा राजकीय पक्ष फोडण्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रित केला आहे. आम्ही पैशांच्या मागे जाणारे नाहीत असे सांगत आपली वडिलोपार्जित तळगाव येथील जमीन वगळता एकही इंच भूखंड कोठे नाही!
जमीन बळकावनारे विरोधक आपल्या विरोधात राहणार आहेत. त्यांना त्याचा पराभव दिसत आहे . त्यामुळे ते त्यातल्या- त्यात कमी मतांनी कोण पडेल असा उमेदवार देण्यासाठी विरोधकांची चाचपणी सुरू असल्याचा खोचक टोलाही यावेळी खा राऊत यांनी विरोधकांना लगावला.
जनतेचा रोष पाहता थातुर मातुर करून रोष थांबविण्यासाठी संबधित सिडकोचा शासन निर्णय रद्द केल्याचे खोटे सांगितले जात आहे. सिडको चा शासन निर्णय अद्याप रद्द झालेला नाही. आम्हाला भजन कीर्तन आवडते तर त्यांना मदिरालयातील नाच आवडतात असा खोचक टोलाही यावेळी विरोधकांना लावतानाच मशालीचा विजय नक्कीच आहे. मतदारांनी पुन्हा एकदा मला विजयी करून विजयी हॅट्रिक करण्याची संधी द्यावी असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page