लाखोंचे नुकसान : शेतकरी चिंतेत..
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासलगत मळगाव व वेत्ये सीमेलगतच्या काजू बागायतीत सायंकाळी ४ च्या सुमारास लागलेल्या आगीत स्थानिक शेतकऱ्यांच्या काजू बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात विलास राऊळ, सुरेश राऊळ, संजय मोहन राऊळ, दिलीप परशुराम राऊळ यांच्या गावठी व कलमी काजू बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
अचानक लागलेल्या या आगीत अनेक झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली. वाळलेले गवत तसेच सुखा पाला पाचोळा असल्याने बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. याबाबतची माहिती मिळताच माजी सभापती राजू परब यांनी नगरपालिकेत संपर्क साधत अग्निशमन बंब पाचारण केला. या बंबाच्या सहाय्याने थोड्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र काजू बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काजूसाठी रात्रंदिवस घेतलेली मेहनत आणि ऐन काजू लागणीच्या वेळेत संपूर्ण काजू बागायतीचे झालेले नुकसान पाहून शेतकरी चिंतेत सापडला आहे. शासनाकडून या नुकसानीची भरपाई भेटेल काय, असा सवाल या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधुन केला जात आहे
