⚡बांदा ता.०४-: शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील अंतर्गत कौशल्यांचा विकास व्हावा तसेच शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये परस्पर सहकार्य राहावे या हेतूने दिव्य ज्योती स्कूल डेगवे प्रशालेमध्ये “सिनर्जीया २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शाळेच्या मैदानावर खास पालकांसाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकांमधील कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रशालेने या दिवशी पालकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
पालकांनी नृत्य, गाणी आणि नाटके असे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेत विद्यार्थ्यांनी बँड डिस्प्ले प्रदर्शन करून पालकांचे केलेले स्वागत हा कौतुकाचा विषय ठरला. यादिवशी प्रशालेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शेती, उद्योग, बायो टेक्नॉलॉजी, नैसर्गिक आपत्ती, जलसंवर्धन, सौरऊर्जा, औषधी वनस्पती, प्रकाश परावर्तन, स्मार्ट सिटी, हृदय, श्वसनसंस्था यांच्या प्रतिकृती, सौरमंडल रचना अशा एकूण ४० प्रतिकृतींचे प्रदर्शन लावले होते. हे प्रदर्शन पालकांसाठी लक्षवेधी ठरले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गामध्ये केलेल्या वर्ग सजावट आणि कला प्रदर्शनाने पालकांची वाहवा मिळवली.
शाळेच्या परिसरात विविध मनोरंजनात्मक खेळाचे स्टॉल तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेऊन स्वनिर्मितीचा आनंद आणि स्वकष्टाचा आनंद उपभोगला. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सिनर्जीया २०२४ या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
दिव्य ज्योती प्रशालेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.
डेगवे प्रशालेमध्ये “सिनर्जीया २०२४” या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
