⚡कणकवली ता.२१-: व्हॅलेंटाईन डे निमित्त एल. एम. नाईक स्मृतिप्रित्यर्थ साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत आजगाव येथील शैलेजा पांढरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कणकवली येथील श्रेयश शिंदे आणि अमरावती येथील राजू पठाण यांनी प्राप्त केला तर शर्वरी जाधव (कणकवली), आनंद जाधव (कणकवली) आणि संजय तांबे (फोंडा) यांना तृतीय क्रमांक मिळाला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन राधिका तांबोळकर (कणकवली), नेहा पालव (तळेरे) आणि अंजली मुतालिक (कणकवली) यांना गौरविण्यात आले.
यावेळी साद फाउंडेशनच्या संस्थापिका लतिका नाईक, अध्यक्षा तसेच कुडाळ प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, सचिव सचिन कोर्लेकर, सदस्य प्रा. अपूर्वा तळेकर व वर्षा तळेकर तसेच पंचायत समिती कणकवलीचे शिक्षण विभाग लिपिक आनंद जाधव, कणकवली पंचायत समितीच्या माजी सहा. प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर, कर प्रशासकीय अधिकारी राजू पठाण, प्रवीण कोरगावकर, सतीश जाधव, विनायक पाटील, पत्रकार, कवी-लेखक श्रेयश शिंदे, लेखक संजय तांबे आणि स्पर्धक कवी, लेखक उपस्थित होते. यावेळी विजयी स्पर्धकांनी आपल्या लिखानाचे स्वतःच्या आवाजात उत्तम सादरीकरण केले. उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या मनोगतातून साद फाउंडेशनला सदिच्छा दिल्या. परीक्षक म्हणून प्रा. अपूर्वा गोलतकर यांनी काम पाहिले.
फाउंडेशनचा सविस्तर आढावा, व्हॅलेंटाईन डे निमित्त पत्रलेखन व काव्य स्पर्धा घेण्याचा उद्देशपर प्रास्ताविक सचिव सचिन कोर्लेकर यांनी केले तर अध्यक्षीय विचार व्यक्त करताना गितांजली नाईक यांनी फाउंडेशनच्या वाटचालीमध्ये ज्यांनी ज्यांनी साथ सहयोग दिला त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अपूर्वा गोलतकर यांनी मानले.
