ऐतिहासिक दस्तावेजाचे प्रदर्शन मांडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने महाराजांना मानवंदना..
⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी येथील ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राणे यांनी काही निवडक ऐतिहासिक दस्तावेजाचे व पुस्तकांचे प्रदर्शन मांडून एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
राणे यांचे शिवजयंतीचे यंदाचे हे ५ वे वर्ष आहे. यावेळी त्यांनी मनुचीने काढलेली छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे काही फोटो प्रदर्शन, अफजलखानाच्या शिक्केतील मजकुर, वाघनखे शस्त्र (प्रतिकृती), शिवराई चलन, शिवकालीन काही ऐतिहासिक पत्रे, अस्सल संदर्भासहीत शिवचरीत्र व इतर पुस्तके, मराठ्यांचे एक लढावू शस्त्र प्रतिकृती, अस्सल राजमुद्रा, काही अस्सल शिवकालीन फर्माने व कट्यार (प्रतिकृती) आदी ऐतिहासिक दस्तवेजांचे प्रदर्शन राणे यांनी आपल्या निवासस्थानी मांडले होते. मळगाव व पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी राणे यांच्या निवासस्थानी भेट देत शिव दर्शनाचा व प्रदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी ज्ञानेश्वर राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, शालेय पुस्तकातून पुसत चाललेला इतिहास बघता शिव इतिहासाला अनुसरून व वैचारीक पद्धतीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा त्यांचे विचार प्रत्येकांनी आचरणात आणावे, या एकमेव उद्देशाने आम्ही ही शिवजयंती साजरी करतो, असे राणे यांनी सांगितले.
