छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात मळगाव शिवमय:मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मळगाव येथे मोठ्या उत्साहात व शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी मशाल रॅली, अभिषेक सोहळा, मोटरसायकल रॅली, ढोल ताशा मिरवणूक, लेझीम नृत्य, हळदी कुंकू, पैठणी खेळ, वेशभूषा स्पर्धा, विविध मर्दानी खेळ व पारंपरिक नृत्यांचा अविष्कार आदी कार्यक्रमांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात मळगाव शिवमय झाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी या भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यनिमित्त सकाळी रेडी येथील यशवंत गड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मळगावपर्यंत भव्य अशी मशाल रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीसह अक्षरशः धावत ही मशाल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आणण्यात आली. त्यानंतर महिलांनी हळद कुंकू लावून मशालीचे पूजन केले.

त्यानंतर ब्राम्हणांच्या व गावातील मानकऱ्यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक सोहळा, पूजा व आरती पार पडली. सायंकाळी होळकर घर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत बाईक रॅली व ढोल ताशा पथक मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत शालेय मुलांनी अप्रतिम असे लेझीम नृत्य सादर केले. त्यानंतर महिला हळदी कुंकू समारंभ व पैठणी खेळ पार पडला. यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवीला. विजेत्या महिला स्पर्धकाचा भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर मुलांची भव्य अशी ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा पार पडली.

यात छोट्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, मावळा आदी विविध ऐतिहासिक वेशभूषा सादर केल्या, या वेशभूषा स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यातील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ व सहभागी सर्व स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

त्यानंतर विविध प्रकारचे मर्दानी खेळ पार पडले. सर्वात शेवटी सावंतवाडी येथील विश्वकला मंचचा पारंपरिक नृत्यांचा अविष्कार कार्यक्रम पार पडला. या सर्व कार्यक्रमांचा गावातील ग्रामस्थांनी लाभ घेतला.

