रुपेश पावसकर:केसरकरांविरोधात वेंगुर्ला येथे लावलेल्या बॅनरचा घेतला समाचार..
⚡सावंतवाडी ता.२०-: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याबाबत जे कोणी विरोधक अज्ञातांकरवी बॅनर बाजी करतात ती त्यांनी थांबवावी, तसेच त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडले आहेत याचे भान देखील बॅनर लावणाऱ्यांना असावे, अशा शब्दात शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी यांनी समाचार घेतला.
पावसकर पुढे म्हणाले, मंत्री केसरकर हे पर्यटकांसाठी नेहमीच पर्यटन सुविधा उपलब्ध करतात. निवती झुलता पूल, वेंगुर्ला झुलता पूल, चांदा ते बांदा योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजना, सिंधुरत्न समृद्धी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजना, ट्रान्सफॉर्मर, रस्ते, रुग्णवाहिका, जलपर्यटन, क्रीडा स्पर्धा आदी विकासात्मक कामांना चालना दिली. मात्र बॅनर लावून शो बाजी करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की जेवढी जहरी टीका तेवढेच केसरकर विजयी घोडदौड करतील, यात तीळमात्र शंका नाही. केसरकर यांनी जेवढा विकास निधी आणून खर्च केला तेवढा कोणत्या लोकप्रतिनीधी यांनी केला ते जाहीर करावे. त्यामुळे विरोधकांनी अज्ञातांकरवी बॅनरबाजी करण्यापेक्षा केसरकर यांच्या साथीने चर्चा करून केसरकर यांचे हात बळकट केल्यास विरोधक औषधालाही शिल्लक राहणार नाहीत, असेही पावसकर म्हणाले.
