सामजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल प्रयत्नांवर पोलिसांची निगराणी…

असा प्रयत्न झाल्यास पोलिसांना कळवा:जिल्हा पोलिस अधीक्षक अग्रवाल यांचे आवाहन..

ओरोस ता २५-:
अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्हॉट्स अपव्दारे जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करणाऱ्या व्यक्तीवर सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाच्यावतीने निगराणी ठेवण्यात येत आहे. तसेच एखादी व्यक्ती अशाप्रकारे अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र, खोट्या बातम्या व्हॉट्स अप ग्रुपवर प्रसारीत करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास देणे हे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 39 नुसार आपले कर्तव्य आहे, असे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे.
ज्या व्यक्ती सोशल मिडीयाचा वापर करुन व्हॉट्स अप व्दारे आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र, अफवा, खोट्या बातम्या प्रसारीत करून सामाजिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, अशा व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कायदा कलम 505 (2) नुसार शिक्षेस पात्र आहेत. त्या अनुषंगाने आपण व्हॉट्स अप ग्रुप अॅडमिन म्हणून व्हॉट्स अप ग्रुप वरून कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र, अफवा, खोट्या बातम्या प्रसारीत होणार नाही याची खबरदारी घेतली पाहीजे, असे आवाहन सुद्धा अग्रवाल यांनी केले आहे.
या प्रकारे व्हॉट्स अप व्दारे कोणी अशा प्रकारच्या अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र, खोट्या बातम्या प्रसारीत करीत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणे येथे त्याचप्रमाणे पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक 02362-228200 तसेच सायबर पोलीस ठाणे 02362-228214 वर तात्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page