Headlines

सावंतवाडीत लोकसहभागातून मातीचे बांध…

दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी नगरपालिकेचा पुढाकार; शहरातील विविध ठिकाणी जलसंधारणाची कामे..

⚡सावंतवाडी, ता.१०-: दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच जलसंधारण आणि पाणी बचतीची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला.

नगराध्यक्षांच्या विशेष पुढाकारातून लोकसहभागातून शहरातील विविध नाल्यांवर मातीचे बांध घालण्याचे काम करण्यात आले.या उपक्रमांतर्गत सालईवाडा येथील विनोद सावंत यांच्या घराजवळील नाल्यात तसेच माठेवाडा येथील अवधूत नार्वेकर यांच्या घराजवळील नाल्यात मातीचे बांध घालण्यात आले. या बांधांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, भूजल पातळी वाढण्यासही हातभार लागणार आहे.
या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात नगरपालिकेच्या विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक तसेच युवराज लखमराजे सावंत भोसले सहभागी झाले होते. याशिवाय एस.पी.के. महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, आरोग्य कृती समिती तसेच सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदान केले.
नगराध्यक्षांच्या पुढाकारामुळे शहरातील जलसंधारणाच्या कामांना गती मिळाली असून, नागरिकांच्या सहभागातून पाणी बचत व जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरपालिकेच्या वतीने शहरातील आणखी काही ठिकाणी मातीचे बांध घालण्यात येणार असून, त्यातून दुष्काळसदृश परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.

You cannot copy content of this page