⚡बांदा ता.१०-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी बांदा या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सावंतवाडीचे माजी सभापती मा. भगवानराव देसाई कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. मा. देसाई यांनी बांदा ज्येष्ठ नागरिक मंचने गेल्या दहा वर्षात पंचक्रोशीतील ज्येष्ठांसाठी राबविलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांबद्दल गौरवोद्गार काढले. संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बांदा पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड साहेब यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईम व फसवणुकीबद्दल मार्गदर्शन केले
या मेळाव्याचे औचित्य साधून बांदा पंचक्रोशीतील संस्थेच्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समिती सदस्य मा सदाशिव राणे, संस्था उपाध्यक्ष महादेव शंकर वसकर, उपाध्यक्षा अनुराधा मोर्ये, बांदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राठोड साहेब, बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे उपस्थित होते. संस्थेच्या उपक्रमांसाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भगवानराव देसाई यांनी रूपये दहा हजार तर संस्था सदस्य वसंत दत्ताराम पावसकर रु पाच हजार, चंद्रकांत महिपत राणे रु एक हजार, विष्णु अर्जुन शेटकर रु दोन हजार, सन्माननीय अतिथी रु दोन हजार, सतीश प्रभुशिरोडकर रु एक हजार, एकनाथ राऊळ पाचशे तर अरूण मोर्ये रु पाचशे पंच्याहत्तर देणगी दिली.
मेळाव्यास शंभर पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.तसेच सूत्रसंचालन हनुमंत मालवणकर यांनी तर आभारप्रदर्शन भिकाजी धुरी यांनी केले.

