उद्याचे उपोषण स्थगित..
⚡बांदा ता.२५-: महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अजूनही काही पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला नाही. सदर प्रोत्साहन अनुदान देण्यात शासन टाळाटाळ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर इन्सुली येथील शेतकरी अभय विश्वनाथ आजगावकर यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आजगावकर यांच्या खात्यात शासनाच्या वतीने प्रोत्साहन अनुदान ५० हजार जमा करण्यात आले. त्यांनी पुकारलेले उपोषण यामुळे स्थगित करण्यात आले.मात्र उपोषणाचा इशारा दिल्यानंतरच निधी कुठून उपलब्ध झाला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
इन्सुली येथील शेतकरी अभय आजगावकर यांनी प्रोत्साहन अनुदान मिळवण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. तशा आशयाचे निवेदन त्यांनी पालकमंत्री सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, सहाय्यक निबंधक सावंतवाडी व इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीला दिले. या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी कर्जमाफी योजना दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. पैकी काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला. मात्र काहींना लाभ मिळाला नाही.
प्रोत्साहन योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना २५ जानेवारी पर्यंत प्रोत्साहन अनुदान रक्कम खात्यावर वितरित न केल्यास प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय आजगावकर यांनी घेतला होता. उपोषणाचा इशारा दिल्यानंतर संबंधित विभाग खडबडून जागा झाला असून त्यांनी आजगावकर यांचे ५० हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले. प्रथम दर्शनी हे अनुदान फक्त एकट्या आजगावकर यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती मिळाली आहे
उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सावंतवाडी तालुक्यातुन असंख्य शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क करून आपणही अनुदानापासून वंचित असल्याचे सांगत उपोषणाला पाठींबा दिला होता. मात्र प्रोत्साहन निधी जमा झाल्यानंतर त्यांनी आपण उपोषण मागे घेतल्याचे पत्र बांदा पोलिसांना दिले असून त्यांनी २६ जानेवारी चे उपोषण स्थगित केले आहे. ज्या शेतकऱ्यांना हा प्रोत्साहन निधी मिळाला नाही त्यांनी एकत्र येऊन पुन्हा शासनाशी पत्रव्यवहार करूया असे आवाहन सुद्धा शेतकरी अभय आजगावकर यांनी केले आहे.
