काशिनाथ सामंत:नगर वाचनालय, वेंगुर्ला यांच्यातर्फे पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न ..
⚡वेंगुर्ला ता.२४-: विद्यार्थ्यांनी सभ्यता, शिस्तबद्धता जोपासली पाहिजे. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो. स्पर्धा ही जीवनात आवश्यक गोष्ट आहे आणि त्याला आपण सामोरे गेले पाहिजे. वाचनालये ही आपली संस्कृती समृद्ध करण्याचे साधन आहे. त्याचा प्रत्येकाने आपले भविष्य घडविण्यासाठी वापर केला पाहिजे असे उद्गार कुडाळ हायस्कूलचे माजी प्राचार्य काशिनाथ सामंत यांनी काढले.
नगर वाचनालय, वेंगुर्ला यांच्यातर्फे पुरस्कार वितरण व पारितोषिक वितरण कार्यक्रम २१ जानेवारी रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात दै.तरूण भारतचे प्रतिनिधी माधव कदम (कणकवली) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, सौ. उषा परब (सावंतवाडी) यांना आदर्श साहित्यिक पुरस्कार, विजयकुमार फातर्पेकर (सावंतवाडी) यांना आदर्श ग्रंथालय, कै.सौ.विजया वामन पाटणकर वाचनालय कुडाळ यांना आदर्श ग्रंथालय पुरस्कार, नट वाचनालय बांदाचे कर्मचारी सौ.सुस्मिता सीताकांत नाईक यांना आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर यांनी प्रा.मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीबद्दल त्यांच्या कार्याची माहिती दिली. माधव कदम यांनी वेंगुर्ल्यातील आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. निस्पृह पत्रकारिता व केलेल्या लेखन साहित्याबद्दलही माहिती देऊन एका उज्ज्वल परंपरा असलेल्या संस्थेने गौरविल्याबद्दल आभार मानले. वेंगुर्ल्याच्या सान्निध्यात राहून मी माझे लेखन केले. इथल्या निसर्गरम्य वातावरणात मी खूप वर्ष वावरले असल्याचे उषा परब यांनी सांगितले. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या सुट्टीत मुलांसाठी बाल वाचनकट्टा, नाट्य प्रशिक्षणे आदी उपक्रम घेत असल्याचे श्री.फातर्फेकर यांनी सांगितले. ही संस्था गेली ३० वर्षे विविध स्पर्धा घेऊन ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याबाबत कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी माहिती दिली. देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून असे कार्यक्रम संस्था घेत आहे असे कार्यवाह कैवल्य पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी संस्थेतर्फे घेतलेल्या श्रीकृष्ण स.सौदागर पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रमातील व अ.ना.शेणई वक्तृत्व स्पर्धेतील तसेच सुदत्त कल्याण निधी, पं. जनार्दनशास्त्री कशाळीकर, भालचंद्र कर्पे स्पर्धेतील विजेत्यांना आणि मनोहर शां. भांडारकर वक्तृत्व स्पर्धेतील विजेते ओंकार तेंडोलकर (पाटकर हाय.), मयुरेश सौदागर (खर्डेकर कॉलेज), लतिका सातार्डेकर (पाटकर हाय.), ज.बा.आरोसकर वक्तृत्व स्पर्धेतील विजेते एल्वीरा रॉड्रीग्ज (रोझरी स्कूल मालवण), अपूर्वा पेडणेकर (पाटकर हाय.), प्राची कावळे (सरस्वती विद्या.आरवली) यांना गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपकार्यवाह माया परब, सदस्य मंगल परूळेकर, नंदन वेंगुर्लेकर, शांताराम बांदेकर, दीपराज बिजितकर, विठ्ठल करंगुटकर, वीरधवल परब, श्रीनिवास सौदागर, किरातच्या संपादक सीमा मराठे, रमण किनळेकर, कुडाळ वाचनालयाचे भार्गवराम धुरी, विठ्ठल पाटणकर, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
