जलव्यवस्थापन सभेत अध्यक्ष म्हापसेकर यांचे आदेश
सिंधूदुर्गनगरी ता १८ देवगड विजयदुर्ग प्रादेशिक नळ पाणी योजनेवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र या योजनेची पाणी पट्टी आवश्यक त्या प्रमाणात वसूल होत नाही. या योजनेची आतापर्यंत तब्बल ७४ लाख रुपयांची पाणी पट्टी थकीत असल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. यावर ज्या ग्रामपंचायत पाणी पट्टी भरत नाहीत अशा ग्रामपंचायत चा पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश जिप अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत दिले. तसेच पंधरा हत्ती पोसण्यासारख्या या योजनेच्या दुरुस्तीचे खर्च न करता जलजिवन मिशन योजनेत या योजनेचा समावेश करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली. जि.प. जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जि.प. अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य संजय आंग्रे, मायकल डिसोजा, सरोज परब, संजना सावंत, निमंत्रित सदस्य अजय आकेरकर, प्रमोद कामत, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे श्रीपाद पाताडे आदी अधिकारी उपस्थित होते.
