⚡कणकवली ता.१९-:
-मुबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुंबई बाहेरील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होत असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. याबाबत आपण स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सूचना दिल्या होत्या. परंतु अद्यापपर्यंत त्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे याप्रकरणी मुंबईकरांचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारी रोजी केईएम हॉस्पिटलच्या आवारात कार्यकर्त्यांसोबत लाक्षणिक उपोषण करणार आहे, असे निवेदन भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, माजी आमदार या नात्याने रुग्णसेवेनिमित्त मुंबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल येथे आपण वारंवार जात असतो. याठिकाणी येणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक कोकण व महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. पण, त्यांना राहण्याची सोय नसल्याने ते फुटपाथवर झोपतात त्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोव्हिड सारख्या आजारामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक व्हायरल इन्फेक्शन होवून आजार पसरवू शकतात. यावर आपण मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून सदर हॉस्पिटलच्या आजूबाजूला नातेवाईकांना रुग्णांच्या राहण्यासाठी महानगरपालिका प्रशासनामार्फत तरतूद करावी किंवा केईएम हॉस्पिटलच्या आवारात इमारत बांधावी व तशी तरतूद २०२४-२५ या अर्थ संकल्पात करावी. या गोष्टीकडे मुंबईकरांचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ रोजी आपण उपोषणास बसणार असल्याचे प्रमोद जठार यांनी म्हटले आहे.
