मालवण ओवळीये येथे शॉर्ट सर्किटने घराला आग…

सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान:सुदैवाने जिवीत हानी टळली..

⚡मालवण ता.१६-: मालवण तालुक्यातील ओवळीये येथील नंदकुमार मनोहर आंगणे यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने श्री आंगणे यांचे २ लाख पाच हजार शंभर रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने या आगीत जिवीत हानी झाली नाही ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, ओवळीये येथील नंदकुमार आंगणे आणि त्यांचे कुटुंबीय हे काल रात्री जेवणखाण आटोपून झोपी गेले होते
अचानक घरातून आगीचे लोटच्या लोट दिसून येताच श्री आंगणे कुटूंबियांनी आरडाओरडा सुरू केला त्यामुळे आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा सुरु केला. मात्र आग अधिकच भडकत होती. आग विझविण्याचे ग्रामस्थांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाना उशिराने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत घर व घरातील साहित्य जळून खाक झाले. घराला आग लागल्याचे कळताच नंदकुमार आंगणे हे आई, पत्नी व मुलगा यांसह प्रसंगावधान राखत घराबाहेर आले. घराला लागून असलेल्या गोठ्यात पाळीव जनावरे होती. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र भडकलेल्या आगीत शेतकरी कुटुंबीय असलेल्या आंगणे यांचे घर जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आग लागल्याची माहिती मिळताच माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनास याबाबत माहिती देण्यात आली आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आंगणे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

You cannot copy content of this page